५ मे रोजी वितरण सोहळा ; पुरस्काराची रक्कम दुप्पट

गेली तीन वष्रे संचालक मंडळाच्या वादात रखडलेले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत, तंत्रज्ञ, कर्मचारी यांना देण्यात येणारा चित्रकर्मी पुरस्कार विलास रकटे, चंद्रकांत जोशी, श्रीकांत नरुले, प्रकाश िशदे यांच्यासह १५ जणांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा ५ मे रोजी येथील केशवराव भोसले नाटय़गृहात होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष मेघराज भोसले यांनी शनिवारी  पत्रकार परिषदेत दिली. यंदापासून पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत प्रदीर्घ सेवा केलेल्या विविध विभागांतील ज्येष्ठ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. २०१४ पासून पुरस्कार देण्याची प्रक्रिया खंडित झाली होती. त्यामुळे २०१४ ते १७ अशा तीन वर्षांच्या कालावधीतील एकत्रित चित्रकर्मी पुरस्कार १५ जणांना जाहीर करण्यात आला आहे. मानचिन्ह, रोख दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार राज्यात तीन ठिकाणी देण्यात येणार असून, पश्चिम महाराष्ट्रातील चित्रकर्मी पुरस्कार प्रदान सोहळा कोल्हापूर येथे होणार आहे. याशिवाय मुंबई, पुणे व उर्वरित महाराष्ट्रातील पुरस्कार सोहळे होणार आहेत.

चित्रकर्मी पुरस्कार विजेते

  • ’विलास रकटे :अभिनेता
  • ’चंद्रकांत जोशी: दिग्दर्शक लेखक
  • ’श्रीकांत नरुले : गीतलेखक
  • ’प्रकाश शिंदे : छायाचित्रण
  • ’अशोक पेंटर : कलादिग्दर्शक, स्थिर छायाचित्रण
  • ’अशोक ऊर्फ प्रकाश निकम : ध्वनिरेखक
  • ’गीताबाई वंटमुरीकर : अभिनेत्री
  • ’सिद्धू गावडे : निर्मिती व्यवस्थापक
  • ’शशी यादव : रंगभूषाकार
  • ’कमल पाटील : वेशभूषाकार
  • ’किसन पोवार :लाइटमन सहा. छायाचित्रण
  • ’कृष्णात बापू चव्हाण: लाइटमन डिपार्टमेंट
  • ’विजय कल्याणकर:कामगार
  • ’प्रताप गंगावणे : लेखक
  • ’जगदीश पाटणकर:
  • निर्माता, दिग्दर्शक, लेखक-सांगली
  • ’कै. बजरंग रामचंद्र भोसले (वाईकर) भोजन व्यवस्था मरणोत्तर