‘मै आज भी फे के हुए पैसे नही उठाता..’ असा डायलॉग पडद्यावर साध्या कपडय़ात दिसणाऱ्या अमिताभ बच्चनच्या तोंडून बाहेर पडताच पिटात टाळ्यांचा एकच कडकडाट होतो. आणि अमिताभला ‘अँग्री यंग मॅन’ ही उपाधी मिळते. पिझ्झा खायच्या ध्येयाने झपाटलेली दोन लहानगी समोर आलेला पिझ्झाचा उष्टा तुकडा खायचा नाकारतात आणि ज्या टेचात स्वत:चा हक्काचा पिझ्झा मिळवण्यासाठी बाहेर पडतात ते पाहिल्यावर आपल्यालाही स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही.
‘हाफ तिकीट’ हा कुठल्याही अर्थाने फक्त लहान मुलांचा चित्रपट उरत नाही. गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या ‘काक्का मुताई’ या चित्रपटाचा मराठी रिमेक असलेला ‘हाफ तिकीट’ इथल्या मातीचं वास्तव घेऊन दिग्दर्शक समित कक्कड यांनी अस्सल रंगवला आहे. एरव्ही चित्रपटांमधून झोपडपट्टीतलं जीवन चित्रित करताना तिथली गरिबी हाच केंद्रबिंदू ठेवून परिघातली कथा आपल्यासमोर येते. या चित्रपटात नाल्याच्या कडेने वसलेली झोपडपट्टी, तिथली माणसं दाखवताना कॅ मेरा त्यापलीकडे बरंच काही टिपतो. घाणीच्या साथीने राहत असलेली, छोटय़ाशा ताडपत्रीवजा घरात राहतानाही स्वच्छतेने राहणारी, मानाने जगणारी, रोजचा दिवस आपल्यापरीने हसतखेळत घालवणारी, एकमेकांना सुखदु:खात सांभाळून घेणारी माणसंही दिसतात.
दोन भाऊ, एकाचं नाव छोटं कावळ्याचं अंड (विनायक पोतदार) आणि दुसऱ्याचं नाव मोठय़ा कावळ्याचं अंड (शुभम मोरे). त्यांच्या नावापासूनच खरं म्हणजे त्यांच्या परिस्थितीची ओळख होते. वडील तुरुंगात त्यांना सोडवण्यासाठी जिवाचे रान करून वकिलाचे पैसे भरणारी आई आणि घरात त्यांना सांभाळणारी एक आजी एवढंच त्यांचं विश्व आहे. परिस्थिती नाही त्यामुळे कोंबडीची अंड खाण्याची ऐपत नाही. मग झाडावर असलेल्या कावळ्याच्या घरटय़ातली अंडं आवडीनं खाणारी ही दोन्ही मुलं कावळ्याचं अंड म्हणून बदनाम आहेत. शिक्षण घेणंही शक्य नसलेले हे दोघे भाऊ पटरीवर पडलेले दगडी कोळश्यांचे तुकडे गोळा करून ते विकतात आणि पैसे आईकडे देतात. नेहमीच्या या पद्धतीने जीवन जगणाऱ्या या दोन लहानग्यांच्या विश्वात नव्याने उघडलेल्या पिझ्झाच्या आऊटलेटच्या निमित्ताने टेस्टी पिझ्झाचा प्रवेश होतो. २९९ रुपयांचा पिझ्झा मिळवण्यासाठी त्या दोघांनीही घेतलेले कष्ट, प्रामाणिकपणे पैसे मिळवूनही केवळ झोपडपट्टीतील मुलं म्हणून त्यांना नाकारण्यात आलेला पिझ्झा आणि त्याबरोबरीने सोईचं राजकारण करणाऱ्या झोपडपट्टीतील बेकार तरुण, स्थानिक नेता ते पिझ्झा आऊटलेटचा मालक ही सगळी साखळी विणताना दिग्दर्शक अनेक गोष्टींवर भाष्य करत जातो.
दोन ‘हाफ तिकीट’च्या नजरेतून दिसणाऱ्या पिझ्झावर मागासलेला सामाजिक दृष्टिकोन, भ्रष्टाचार, परिस्थितीमुळे आलेलं हताशपण, ते स्वीकारूनही जिद्दीने पण प्रामाणिकपणे पुढे जाणारी मनं अशा अनेक गोष्टीचं टॉपिंग करून समित कक्कड यांनी चित्रपट सुंदर केला आहे. विनायक पोतदार आणि शुभम मोरे या दोघांनीही चित्रपटात अफलातून काम केले आहे. त्यांची आई झालेली अभिनेत्री प्रियांका बोस कामत आणि आजीच्या भूमिकेतील उषा नाईक यांच्यामुळे कास्टिंगमध्येच दिग्दर्शकाने अर्धी लढाई जिंकली आहे. त्याला उत्तम पटकथा, संजय मेमाणे यांचे छायाचित्रण, पाश्र्वसंगीतासारखा झालेला उत्तम गाण्यांचा वापर या सगळयामुळे ‘हाफ तिकीट’ हा नितांतसुंदर अनुभव ठरला आहे.
हाफ तिकीट
निर्माता – नानूभाई जयसिंघानी
दिग्दर्शक – समित कक्कड
कलाकार – शुभम मोरे, विनायक पोतदार, भालचंद्र कदम, प्रियांका कामत बोस, उषा नाईक.