पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील संत तुकाराम सवरेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट.. बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पेशल ज्युरी अ‍ॅवॉर्डचा मानकरी.. जागतिक पातळीवरील दहा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेला.. ‘लेथ जोशी’ हा चित्रपट मराठी चित्रपट रसिकांना पाहणे दुष्प्राप्य झाले आहे. राज्य शासनाचा पुरस्कार या निकषामुळे ‘लेथ जोशी’ चित्रपटाला शासकीय अनुदान मिळू शकलेले नाही आणि वेगळय़ा धाटणीच्या या चित्रपटासाठी कोणी वितरक पैसे गुंतविण्यास तयार नसल्याने हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेतच आहे.

‘लेथ जोशी’ ही यांत्रिकीकरणामध्ये अस्ताला जाणाऱ्या तंत्राची, हरणाऱ्या श्रमिकाची आणि त्याच्या कौशल्याची गोष्ट आहे. पूर्वी कारखान्यामध्ये काम करताना कामगाराच्या कौशल्याची जागा आधुनिक लेथ यंत्राने घेतली. या आधुनिकीकरणामुळे त्या कामगाराची कौशल्य साधने आणि त्यापाशी जपलेल्या भावनाच काळाच्या पडद्याआड जातात हा विषय मंगेश जोशी या युवा लेखक-दिग्दर्शकाने ‘लेथ जोशी’मधून मांडला आहे. चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, सेवा चौहान आणि ओम भूतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मंगेश जोशी यांच्या पत्नी सोनाली जोशी निर्मात्या असून, संगीतकार नरेंद्र भिडे आणि नितीन वैद्य हे सहायक निर्माते आहेत. सारंग कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

बदल हा चित्रपटाच्या निर्मितीपासूनचा आहे. पूर्वी चित्रपट सेल्युलॉइड म्हणजेच रिळांच्या माध्यमातून केला जात होता. आता डिजिटल माध्यम आले आहे. मला या माध्यमात चित्रपट करायचा नव्हता. पारंपरिक माध्यमातून मी बदलाची कथा सांगितली आहे. केमिकल इंजिनिअर ही पदवी संपादन केल्यानंतर मला चित्रपट माध्यमाने आकर्षित केले. संजय सूरकर यांच्याकडे ‘अवंतिका’ मालिकेसाठी आणि सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्याकडे ‘नितळ’ चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले असल्याने हा अनुभव गाठीशी होता, असे मंगेश जोशी यांनी सांगितले. हा चित्रपट करण्यापूर्वी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) निर्मित भोजपुरी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

सर्बियन दिग्दर्शक गोरान पास्कोविच यांनी कान चित्रपट महोत्सवासाठी या चित्रपटाची शिफारस केली होती. राज्य किंवा राष्ट्रीय पुरस्कार असलेल्या चित्रपटालाच अनुदान मिळते. त्या अर्थाने हा व्यावसायिक चित्रपट नसल्याने पैसे परत मिळण्याची शाश्वती नाही. त्यामुळे चित्रपटाच्या वितरणासाठी कोणी पैसे गुंतवण्यास तयार नाही. आपला समाज कशा पद्धतीने बदलत गेला त्यावर हा चित्रपट भाष्य करतो. जागतिक, आर्थिक, कौटुंबिक मूल्य आणि मानवी संबंध यांच्यातील संघर्षांबरोबरच मानसिक स्थिती याविषयीचे चित्रण असलेला हा चित्रपट म्हणजे साध्या पद्धतीने सांगितलेली गुंतागुंतीची गोष्ट आहे. अर्थात, हे सोपे म्हणजे सामान्य नाही, असेही मंगेश जोशी यांनी सांगितले.