नाटकाचा व्यवसाय तसा जोखमीचाच. बिनभरवशाचा. लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांची भट्टी जमायला हवी आणि त्यांची प्रेक्षकांशी गट्टी झाली तर नाटक चालतं, अन्यथा तोटाच पदरी पडतो. सध्याच्या या धावत्या युगात सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये जास्त नाटकं पाहिली जात नाहीत. गल्ला भरतो तो शनिवार आणि रविवारीच. त्यामध्ये तारखांसाठीही मारामार. नामांकित नाटय़संस्थेलाच शनिवार-रविवारसाठी पसंती दिली जाते. त्यामुळे नवख्या निर्मात्यांचे हालच होतात. पण तरीही काही मंडळी ज्यांचा थेट नाटय़निर्मितीशी संबंध नाही, अशी या क्षेत्रात आली. यामधलं सध्याच्या घडीला आघाडीचं नाव म्हणजे मधुकर रहाणे, भारताचा फलंदाज अजिंक्यचे बाबा. त्याचबरोबर हे क्षेत्र जवळपास ४०-५० वर्षे पाहिल्यावर निर्मितीक्षेत्रात उतरलेली दोन अनुभवी मंडळी म्हणजे गोटय़ा सावंत आणि सुरेंद्र दातार. नाटय़निर्मितीमधील नफ्या-तोटय़ाचा विचार न करता फक्त आवड म्हणून किंवा ऋण फेडण्यासाठी या मंडळींनी नाटकाची निर्मिती केली आहे.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
chaturang article loksatta
‘भय’ भूती : वारसा हक्काने मिळालेली भीती
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

जवळपास १९७० सालापासून नाटकाशी संबंधित असलेली व्यक्ती म्हणजे गोटय़ा सावंत. नेपथ्य, कपडेपट, प्रकाशयोजना, संगीत, लेखन, अभिनय, नाटय़ कंपनीचे व्यवस्थापक ते नाटय़निर्माता या साऱ्या आघाडय़ांवर त्यांनी काम केलं आहे. एका नाटकात तोटा झाल्यामुळे त्यांना घरही विकावं लागलं होतं. हे क्षेत्र सोडून ते बायकोच्या घरी पुण्याला राहायला गेले. त्यानंतर मुंबईत येऊन एक छोटेखानी व्यवसाय सुरू केला. त्या वेळी प्रभाकर पणशीकर त्यांना शोधत आले आणि पुन्हा नाटय़क्षेत्रात त्यांचं पुनरागमन झालं.

‘१९७० साली मी, मोहन तोंडवळकर ‘कलावैभव’ या नाटय़संस्थेचे व्यवस्थापक होतो. आठ वर्षे हे काम केले. त्यानंतर ‘तोची वासू ओळखावा’ या नाटकाची निर्मिती केली. या नाटकातले सर्व कलाकार मोठे झाले, त्यांना २०-३० रुपये मानधन देत होते. त्यानंतर १९८२ साली रत्नाकर मतकरी यांचं ‘स्पर्श अमृताचा’ या नाटकाची निर्मिती केली. त्या वेळी मी जवळपास दोन लाख रुपये खर्च केला होता. पण नाटकाचं नशीब चांगलं नव्हतं. नाटकामुळे प्रचंड तोटा झाला. तो भरून काढण्यासाठी वांद्रे येथील घर मला विकावं लागलं. त्यानंतर मी बायकोच्या घरी पुण्याला राहायला गेलो. अर्थार्जनाचं साधन नव्हतं. काही वर्षांनी मुंबईत गोरेगावला एक व्यवसाय सुरू केला. काही दिवसांनी पंत पणशीकर मला शोधत आले आणि माझे नाटय़क्षेत्रात पुनरागमन झाले. १९८७ साली ‘मला उत्तर हवंय’ हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणलं. तेदेखील चाललं नाही. त्यानंतर दोन ‘हीट अँड हॉट’ नाटकं काढली. सेन्सॉर बोर्डामुळे ती बंद करावी लागली. त्या वेळी पंतांनी मला एक सल्ला दिला, चौकार-षटकार मारण्यापेक्षा एकेरी-दुहेरी धाव घेत राहायचं असतं. त्यांचा सल्ला शिरोधार्य मानून मी पुन्हा निर्मिती व्यवस्थापन क्षेत्रात काम सुरू केलं, आता ८-९ नाटकांचं व्यवस्थापन माझ्याकडे आहे. पण नाटकाची निर्मिती करायचं अजूनही मनात आहे’, असं गोटय़ा सावंत सांगतात.

मोहन वाघांकडे तब्बल २० वर्षे सुरेंद्र दातार यांनी काम केलं. त्यामुळे ‘चंद्रलेखा’ संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचे निमित्त साधत दातार यांनी वाघ यांना कुर्निसात करण्याठी ‘आइचं पत्र हरवलं’ या नाटकाची निर्मिती केली. नवीन निर्माते आणि कलाकार असल्यामुळे नाटकाला उठाव मिळाला नाही. पण हे सर्व माहीत असूनही दातार यांनी वाघांसाठी नाटकाची निर्मिती केली. ‘वाघ यांनी मला घडवलं, शिस्त लावली. त्यामुळे त्यांचं मी देणं लागतो. चंद्रलेखाचं सुवर्णमहोत्सवी वर्षांचं औचित्य साधून मी एका नाटकाची निर्मिती करून त्यांना अर्पण करण्याचं ठरवलं. त्यामुळे माझ्यासाठी हे नाटक किती फायदा करून देईल, हा विचार आलाही नाही. हा एक कृतार्थ भाव आहे,’ असं दातार सांगत होते.

मधुकर रहाणे हे मध्यमवर्गीय कुटुंबातले. पण लहानपणी ते काही मित्रांना घेऊन नाटक बसवायचे. त्यानंतर अभ्यास आणि कामाच्या व्यापात त्यांना नाटकासाठी भरीव असे काही करता आले नाही. नोकरी करत असताना साहित्यातील काही मंडळींशी त्यांचा संबंध येत गेला. सेवानिवृत्त झाल्यावर मात्र त्यांनी नाटकाची निर्मिती करायचं ठरवलं. या वेळी अजिंक्यला हे थोडसं पटत नव्हतं. त्याचं म्हणणं होतं की, आतापर्यंत तुम्ही जे काम केलं तेच स्वत:हून सुरू करावं. नाटय़क्षेत्राचा आपल्याला अनुभव नाही, त्यामुळे नाटय़निर्मिती क्षेत्रात उतरू नये, असं अजिंक्यला वाटत होतं. पण मुधकररावांनी आपला हट्ट काही सोडला नाही. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांची आणि रहाणे यांची ओळख झाली. काही संहिता केंकरे यांनी रहाणे यांना वाचून दाखवल्या. सुरुवातीच्या काही संहिता रहाणे यांना आवडत नव्हत्या. त्यामध्ये २-३ वर्षे गेली. त्यानंतर केंकरे यांनी रहाणे यांना अभिजित गुरूची ‘तीन पायांची शर्यत’ ही संहिता ऐकवली आणि त्यांना ती पसंत पडली. ‘सुयोग’ नाटय़संस्थेची मदत घेत रहाणे यांनी हे नाटक रंगभूमीवर आणलं.

‘नाटक ही माझी आवड आहे आणि ती जोपासण्यासाठीच मी नाटय़निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. सुरुवातीला अजिंक्यला हा निर्णय काहीसा पटला नव्हता. पण आता नाटकाला मिळालेला प्रतिसाद पाहून तो आनंदी आणि मी समाधानी आहे. या निर्मितीतून मला किती नफा किंवा तोटा होईल, हे माहिती नाही. मला समाधान मिळालं, यामध्येच सारं काही आलं. काही दिवसांपूर्वी नाटकाचे काही प्रयोग दुबईला केले, आता यापुढे अमेरिकेत करण्याचा माझा मानस आहे. हे नाटक सर्व रसिकांपर्यंत पोहोचावं, एवढीच माझी प्रमाणिक इच्छा असल्याचे रहाणे सांगत होते.

मुंबईत जसे घर मिळवणे कठीण तसेच नाटकाची निर्मिती करणेही. सध्याच्या घडीला एका प्रयोगाला जवळपास ७५ हजार रुपये खर्च येतो. नाटय़निर्मिती करताना जवळपास २५-३० लाख रुपये सुरुवातीच्या काही प्रयोगांमध्ये खर्च होतात. पण तरीही नाटकाच्या प्रेमापोटी ही अशा काही वल्ली सातत्याने नाटकाची निर्मिती करत आहेत. ‘घर पहावं बांधून’ याचबरोबर सध्याच्या घडीला ‘नाटक पहावं करून’ असं म्हणण्याची वेळ आली आहे.