नाटककार अभिराम भडकमकर यांचं ‘याच दिवशी याच वेळी’ हे २००३ साली रंगभूमीवर आलेलं नाटक. तोवर टीव्हीचा छोटा पडदा घराघरांतील अवकाश व्यापून दशांगुळं उरला होता. ‘इडियट बॉक्स’च्या गारुडानं सर्वसामान्यांच्या मनाचाच नाही, तर मेंदूचाही कब्जा घेतला होता. दूरचित्रवाहिन्यांचं अंतराळात घनघोर युद्ध पेटलं होतं. आणि युद्धात सगळंच माफ असल्याने प्रेक्षक खेचण्यासाठी वाट्टेल ते करण्याची वाहिन्यांची मजल गेली होती. दर्शकांच्या मेंदूचा ताबा घेतलेल्या टीव्हीने त्यांच्या भावभावना आणि विचार करण्याच्या प्रक्रियेवरसुद्धा आक्रमण केलं होतं. वशीकरणानं त्यांना पुरतं निष्क्रिय व व्यसनाधीन केलेलं होतं. वास्तव आणि टीव्हीतलं जग यांच्यातला फरकही विसरला गेला होता. परिणामी टीव्हीच्या पडद्यावरची माणसं जशी वागता/बोलतात, विचार अन् कृती करतात, तसंच प्रत्यक्षातली माणसंही वागू-बोलू लागली. त्यांच्याच डोक्यानं विचार करू लागली. आपलं प्रत्यक्षातलं जग नजरेआड करून मालिकांमधल्या पात्रांचं भावविश्व, त्यांच्या समस्या या जणू आपल्याच आहेत असं मानून त्यांच्या असल्या/नसलेल्या समस्यांनी संत्रस्त होऊ लागली. त्यांच्या जगण्याचं अनुकरण करू लागली. आणि व्हच्र्युअल जगातच वावरू लागली. इंटरनेटनं तर त्यांना आणखीनच खोल आभासी विश्वात ढकललं. याचे भीषण सामाजिक परिणाम माणसांच्या व्यक्तिगत आयुष्यात तसंच कुटुंबजीवनात दिसून न येते तरच नवल. पर्यायाने समाजजीवनच उद्ध्वस्त होण्याची वेळ येऊन ठेपली. विवेकी जनांनी कानीकपाळी ओरडून ‘हे योग्य नाही..’ हे सांगूनही त्यांच्यात ढिम्म बदल झाला नाही. याचीच किंमत आज आपण मोजतो आहोत. मूल्यांचा ऱ्हास, धोक्यात आलेलं कौटुंबिक/सामाजिक जीवन, संवेदनेला आलेली बधीरता, वाढता चंगळवाद आणि व्यक्तिवादाचा अतिरेक ही त्याचीच परिणती होय. लेखक अभिराम भडकमकरांनी या संवेदनाहीनतेचं, मूल्यऱ्हासाचं अत्यंत भेदक चित्र ‘याच दिवशी याच वेळी’मध्ये उभं केलं आहे. मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी कुमार सोहोनींच्या दिग्दर्शनाखाली नुकतंच या नाटकाचा प्रयोग सादर केला. ‘आशयाला चोख न्याय देणारा प्रयोग’ असं त्याचं वर्णन करता येईल.

सुरेंद्र-अनघा या मध्यमवयीन, नोकरदार दाम्पत्याचं कुटुंबजीवन मांडत असताना त्यांच्या आयुष्यात उत्पन्न झालेले परिस्थितीजन्य पेच, त्याला सभोवतालचे असलेले संदर्भ, त्यातून अवनतीकडे होणारा त्यांचा प्रवास हा या नाटकाचा गाभा आहे. मोठय़ा कष्टांनी परिस्थितीशी दोन हात करत सुरेंद्रनं उभारलेलं आपलं विश्व, जीवघेण्या स्पर्धेतील त्याचा रात्रंदिन संघर्ष, स्पर्धेत टिकण्यासाठी, आपली व्यक्तिगत स्वप्नं पुरी करण्यासाठी त्यानं मूल्यांशी केलेली तडजोड, त्यावरून त्याच्या मनात चाललेली घालमेल एका बाजूला. तर दुसरीकडे चंगळवादी भोवतालात वाहवत गेलेली त्याची पत्नी अनघा. टीव्हीतल्या माणसांच्या विश्वात गुंगून गेलेली. त्यांचं अंधानुकरण करणारी. तीच गोष्ट तिच्या मैत्रिणीची- विशाखाची. इडियट बॉक्समधून प्रसारित होणारी मूल्यं, बाजारपेठीय विक्रीतंत्राची तीही बळी झालीय. त्यातून निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना तिला सतत पोखरते आहे. इकडे सुरेंद्र-अनघाचा मुलगा मानस पौगंडावस्थेतील बदलांशी झुंजतो आहे. त्याला कुणी नीट समजून घेत नाही. त्यामुळे त्यानं बंड पुकारलेलं. तशात तो प्रियाच्या अनावर आकर्षणात ओढला जातो. ती अत्याधुनिक विचारांची मुलगी आहे. ‘वापरा आणि फेकून द्या’ हे तिच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान. एकमेकांशी संवाद हरवलेल्या, ‘स्व’शीच देणंघेणं असलेल्या या कुटुंबाचं हे चित्र प्रातिनिधिकच म्हणायला हवं. जागतिकीकरणाने ज्या असंख्य उलथापालथी केल्या, त्याचंच हे प्रत्यक्षरूप. लेखकानं तितक्याच नृशंसपणे, क्रौर्यानं ते नाटकात चित्रित केलं आहे. यातली पात्रं आपल्या आजूबाजूचीच नाहीत, तर ती आपणच आहोत, ही जाणीव किंचितशी संवेदना असलेल्यांनाही नक्कीच होईल.

marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
cbi summoned akhilesh yadav in illegal mining case in uttar pradesh
अवैध खाण प्रकरण: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?

दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी प्रयोग बंदिस्त व टोकदार बसवला आहे. नाटकाचा गाभा भरकटणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली आहे. परंतु दुसऱ्या अंकातील पात्रांच्या आत्मपरीक्षणाचा प्रसंग मात्र त्यांनी थोडा संपादित केला असता तर बरं झालं असतं. टीव्हीच्या कार्यक्रमांतील माणसांचं जग आणि प्रत्यक्षातलं वास्तव जग या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे ठळक करण्यासाठी त्यांनी रंगावकाशाच्या एका कोपऱ्यात टीव्हीवरचे प्रसंग साकारण्याची योजलेली क्लृप्ती मस्त आहे. टीव्हीविश्वातील कृतकता, पोकळपणा, त्यातील पात्रांच्या तोंडची लाडी लाडी भाषा, कृत्रिम संवादफेक यांतून लेखकास अपेक्षित परिणाम साध्य झाला आहे. त्याचवेळी टीव्हीच्या आहारी गेलेली माणसंही त्यांनी त्यातल्या उपहासासकट मूर्त केली आहेत. या साऱ्या पाश्र्वभूमीवर सुरेंद्र आणि मानसचा आंतरिक संघर्ष अधिकच बोचरा होतो. चोख पात्रनिवडीमुळे नाटक प्रभावी होतो.

मुंबई विद्यापीठाच्या मुक्ताकाश मंचावर हा प्रयोग सादर झाल्याने नेपथ्यकार राजन भिसे यांना टीव्हीतलं विश्व तसेच सुरेंद्र-अनघाचं घर साकारण्याकरता भरपूर रंगावकाश उपलब्ध झाला. त्याचा पुरेपूर वापर त्यांनी केला. परंतु त्यामुळे झालं असं, की प्रयोगात पात्रांच्या वावरण्यातच जास्त वेळ जात होता. शीतल तळपदे यांनी टीव्हीचं व माणसांचं प्रत्यक्ष विश्व यांतलं अंतर प्रकाशयोजनेतून सुस्पष्ट केलं.  अरविंद हसबनीसांच्या पाश्र्वसंगीतानं त्यास हातभार लावला. दिपाली विचारे (नृत्यं), पूर्णिमा ओक (वेशभूषा) आणि उलेश खंदारे (रंगभूषा) यांनीही आपली कामगिरी चोख बजावली होती.

प्रसाद माळी यांनी सुरेंद्रची दुभंग मन:स्थिती, त्याचा आंतरिक व बाहेरच्या जगात चाललेला संघर्ष, त्यातून आलेलं चिडचिडेपण, साधं बोलतानाही लागणारा टिपेचा स्वर हे सारं नेमकेपणानं टिपलं.  रुची कदम यांची अनघाही लाजवाब. छोटय़ा पडद्याच्या आहारी गेलेली, त्या विश्वाशी जडलेलं नातं प्रत्यक्षातही अनुसरू पाहणारी आणि त्यातून निराशा पदरी आल्यानं उद्विग्न होऊन अंतर्मुख करणारे प्रश्न उपस्थित करणारी अनघा टीव्हीच्या आहारी गेलेल्या आजच्या स्त्रीवर्गाचं यथोचित प्रतिनिधित्व करते. तिची मैत्रीण विशाखाही तशीच. चंगळवादाच्या भोवऱ्यांत गटांगळ्या खाणारी. त्यातून आलेल्या असुरक्षेच्या भावनेत वाहवत जाणारी. श्रद्धा तपकिरे यांनी तिला चोख न्याय दिला आहे. पौगंडावस्थेतल्या मानसचं भैसाटलेपण, पालकांशी तुटलेला संवाद, भविष्यात आपल्याला नक्की काय करायचंय याची स्पष्टता नसल्याने त्याला आलेली निष्क्रियता, वैफल्य आणि या सगळ्याची त्याच्या वर्तनातून उमटणारी हिंस्र प्रतिक्रिया सौरभ ठाकरे यांनी तीव्रतेनं व्यक्त केली आहे. जागतिकीकरणाचा बळी ठरलेली उपभोगवादी प्रिया- ऋजुता धारप यांनी तिच्या अस्थिरतेसह चपखल उभी केली आहे. किरण पावसकर (सावित्री), रोहन आनंद (करण), सांची जीवने (सुमन), अंकिता नरवणेकर (नेहा), सुरभि बर्वे (आशाताई व निवेदिका), कोमल सोमारे (सौ. चौघुले), समीर रामटेके (योगशिक्षक), एकनाथ गीते (योगविद्यार्थी) यांनी टीव्हीवरील कलाकार त्यांच्या खास लकबींनिशी उत्तमरीत्या साकारले.

सद्य:स्थितीवर भेदक भाष्य करणारं हे नाटक परिणामकारकरीत्या सादर झालं यात काही संशय नाही.