मालिकाविश्वामध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या व्यक्तिरेखा या रंगल्या तर प्रेक्षकांच्या मनावर कायम कोरल्या जातात. त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल अशा पद्धतीने ती व्यक्तिरेखा मालिका संपेपर्यंत रंगवत राहणं हे या कलाकारांसमोरचं मोठं आव्हान ठरतं. एखादी भूमिका हातात आल्यानंतर ती कशी दिसेल, त्याचं वागणंबोलणं, त्याचा व्यवसाय या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना त्याची तयारी करावी लागते आणि ही तयारी जेव्हा पडद्यावर रंग दाखवते तेव्हा त्यांना आपल्या भूमिकेचे चीज झाल्याचे समाधान मिळते. खास दिवाळीच्या निमित्ताने सध्या छोटय़ा पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या ‘भूमिका’ आणि त्यामागची तयारी त्या कलाकारांच्याच शब्दांत..

चालतंय की ! –

मला खरं तर सैनिक होऊ न देशसेवा करायची होती. पण माझं ते स्वप्न काही कारणांमुळे अपूर्ण राहिलं. जेव्हा माझी ‘रणविजय’ या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली. तेव्हा मला थोडं दडपण आलं होतं. कारण आमचे निर्माते मला म्हणाले होते की, तू जर या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ  शकलास तर तुला अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेईल. अन्यथा नाही. मला प्रेक्षकांनी डोक्यावर घ्यावं, माझ्या मागे मागे फिरावं असं मला कधीच वाटलं नाही व वाटतही नाही. केवळ ही व्यक्तिरेखा चोख रंगवणं हे एकच ध्येय माझ्या डोळ्यासमोर होतं व त्याप्रमाणे मी रात्रीचा दिवस करायला सुरुवात केली. मालिका सुरू होण्याच्या आधी माझं वजन कमी होतं. राणा या व्यक्तिरेखेला शोभून दिसण्यासाठी व वजन वाढवण्यासाठी मी विख्यात जिम ट्रेनर विनोद चन्ना यांच्याकडे ट्रेनिंग घेऊ लागलो. दररोज जिममध्ये घाम गाळू लागलो. या मेहनतीच्या जोरावर मी २७ दिवसांत २५ किलो वजन वाढवलं. त्यामुळे माझी शरीरयष्टी दणकट झाली. पुढे शूटिंग चालू झाल्यावर कोल्हापुरी भाषा तंतोतंत अवगत करण्यासाठी मी सेटच्या आसपास राहणाऱ्या लोकांजवळ व शाळेतील मुलांजवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारू लागलो. भाषेचा लहेजा, शब्दफेक व  उच्चार या तिन्ही गोष्टींवर मी मेहनत घेतली. भाषेवर मेहनत घेत असताना मला मालिकेच्या लेखकाने देखील खूप मदत केली. मी पक्का मुंबईकर असल्याने कोल्हापुरी लहेजा जिभेवर उतरवण्यात मला बरीच मेहनत घ्यावी लागली खरी पण त्या मेहनतीचं चीज झालं. पैलवान कसा असतो, तो आखाडय़ात कसा वावरतो, कुस्ती कशी खेळली जाते याचं प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी मला शाहू महाराजांनी चालू केलेल्या आखाडय़ात तालीम घेण्याची संधी मिळाली. पैलवनाचा खुराक खूप जास्त असतो. त्यामुळे सतत खाऊ न खाऊ न त्याचं पोट पुढे आलेलं असतं हे व असे अनेक बारकावे मी समजून घेतले व त्याप्रमाणे मेहनत घेतली. एके दिवशी माझं खऱ्याखुऱ्या पैलवानासोबत चित्रीकरण सुरू होतं. भर चित्रीकरणात त्याने मला एक जोरात गुद्दा मारला ज्याने मी काही काळ थंड झालो. ही परिस्थिती देखील पुन्हा उद्भवू नये म्हणूनही मी मेहनत घेतली. आज मालिकेमुळे व राणामुळे कोल्हापूरमधल्या अनेक बंद तालमी पुन्हा सुरू झाल्या आहेत. केवळ कोल्हापूरमधली नव्हे तर मुंबईतील लहान लहान मुले कुस्ती शिकण्याची इच्छा व्यक्त करताहेत. कोल्हापूरमधल्या मुली शेतकरी व पैलवानाशी लग्न करत नव्हत्या हे चित्र हळूहळू बदलू लागलं आहे. लहान मुले त्यांच्या आई-वडिलांजवळ मला राणादासारखा ट्रॅक्टर व बैलगाडी खेळायला घेऊन या अशी मागणी करतात. या सर्व गोष्टी राणामुळे शक्य झाल्या आहेत हार्दिक फक्त निमित्तमात्र तिथे उभा आहे.

हार्दिक जोशी (तुझ्यात जीव रंगला – झी मराठी )

रागिणीच्या निमित्ताने..

मी स्वत:ला नशीबवान समजते की ‘झी युवा’वर रुद्रम’सारखी सस्पेन्स थ्रिलर मालिका मला साकारायला मिळते आहे. या मालिकेतील माझ्या व्यक्तिरेखेला अनेक नाजूक छटा आहेत. त्या छटा खूप जपून, संयतपणे साकाराव्या लागतात. मी व आमच्या मालिकेचे दिग्दर्शक तसेच मालिकेचे लेखक आम्ही तिघेही प्रत्येक सिनच्या आधी फोनवर ठरवतो की हा सिन कसा शूट करायचा आहे. कारण जर तो चुकीच्या पद्धतीने शूट झाला तर मालिकेचा अँगल बदलू शकतो. त्यामुळे खूप बारीक गोष्टींवर आम्ही सगळेच मेहनत घेत आहोत. रागिणी देसाई ही एक विलक्षण पत्रकार आहे. ती इतर पत्रकारांसारखी ऑफिसमध्ये वावरत नाही. तिची बातम्या देण्याची पद्धत वेगळी आहे. या पद्धतीमुळे ती प्रेक्षकांना चटकन काहीतरी सांगून जाते. या चतुराईसाठी मला फार सावध राहावं लागतं. रागिणी देसाई खुनाचा शोध घेण्यासाठी अनेक वेषांतर करते. मालिकेतलं तिचं गावाकडच्या बाईचं वेषांतर प्रेक्षकांना खूप भावलं. या बाईची भाषा ही मुंबईमिश्रित गावठी आहे. माझी ‘जोगवा’ चित्रपटामधील सुवी व ‘अग्निहोत्र’मधील मंजुळा या व्यक्तिरेखा बघितल्या तर त्या दोन्ही पूर्णपणे गावठी आहेत. पण ‘रुद्रम’मध्ये रागिणीने साकारलेली बाई तशी नाही. हे लेखकाच्या लेखणीचं कौशल्य साकारताना खूप अभ्यासपूर्वक काम करावं लागतं. रागिणीसाठी मानसिक व बौद्धिक मेहनत अधिक घेते आहे..

मुक्ता बर्वे (रुद्रम – झी युवा )

पडद्यावरच्या क्रिकेटसाठी कोचिंग

मी पुण्यात शालेय जीवनात केवळ गल्ली क्रिकेट खेळलो आहे. पण ‘जिंदगी नॉट आऊट’ ही ‘झी युवा’वरची मालिका मिळाली तेव्हा माझा खरं तर क्रिकेटशी काहीच संबंध नव्हता. तिसरीत असताना जेव्हा आपण टी २० जिंकलो. तेव्हा माझ्यावर क्रिकेटची मोहिनी पडली. मी फार उत्साहाने पुण्यातील नेहरू स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झालो. पण तेथील एकंदरीत कडक शिस्तीचं व प्रचंड मेहनतीचं वातावरण बघता मी घाबरून दोन दिवसांत त्या स्टेडियमला राम राम ठोकला. त्यानंतर माझा व क्रिकेटचा फार काही संबंध आला नाही. जेव्हा मला मालिकेच्या कथेबद्दल व माझ्या व्यक्तिरेखेबद्दल कळलं तेव्हा मी ही भूमिका साकारण्यासाठी फार आतुर झालो. कारण प्रत्येक कलाकाराला आपण जे नाही आहोत ते साकारायला नेहमीच आवडत असतं. तसंच काहीसं माझ्याबाबतीत घडलं. भविष्यात सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारा हा तरुण आहे. त्याच्या ऐन तारुण्याचा व मेहनतीचा काळ चित्रित करताना मी माझ्या क्रिकेटपटू मित्रांचा फार बारीक अभ्यास करू लागलो. त्याप्रमाणे स्वत:ला घडवत गेलो. प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी मला वाहिनीने एका नामांकित कोचकडे प्रॅक्टिससाठी व बारकावे समजावून घेण्यासाठी पाठवलं होतं. तेव्हा तिथे केवळ पाच सेशनमध्येच मी सर्व काही शिकलो व त्याप्रमाणे मेहनत घेत गेलो. आज मला अनेक तरुण विचारतात की, तू अनेक वर्ष नियमित खेळतोस का, या प्रश्नातच मी व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे याची पावती मिळते.

तेजस बर्वे  (जिंदगी नॉट आऊट – झी युवा)

सैन्याशी लागिरं झालं जी

मी मूळचा साताऱ्याचा. नृत्य हा माझा छंद आहे. आजही कुठे गाणी वाजू लागली की माझे पाय थिरकू लागतात. पण अनवधानाने अभिनय क्षेत्रात आलो आणि संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. अनेक ऑडिशननंतर मला ‘लागिरं झालं जी’ ही मालिका मिळाली. एक मुलगा सैनिक होण्याचं स्वप्न बघतो आहे. त्याचा सैनिक होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्याची प्रेमकथा दोन्ही समांतर पद्धतीने रंगवायची आहे. मुख्यत: सैनिक म्हणून वागणं, दिसणं-बोलणं हे कसं असतं ते जाणून घेण्यासाठी मी साताऱ्यातल्या सैनिकी शाळेत जाऊ न तिथलं सैनिक विद्यर्थ्यांचं जीवन जवळून पाहिलं. तिथल्या कर्नल सरांनी मला अनेक नवीन गोष्टींची माहिती सांगितली. केवळ या व्यक्तिरेखेला साजेसं दिसण्यासाठी मी दररोज २ किलोमीटर धावतोय. दररोज न थांबत ५० मिनिटं व्यायामाच्या माध्यमातून शरीरयष्टीला आकारात आणण्याचा माझा रोजचा प्रयत्न असतो. या मेहनतीमुळेच आज अजिंक्य सरस ठरलाय असं मी मानतो. या मालिकेमुळे माझा व संपूर्ण महाराष्ट्राचा सैन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आज अनेक तरुण अजिंक्यमुळे भारावून सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करत आहेत. मुली कित्येकदा सैनिकांशी लग्न करायला तयार नसतात. त्यांच्याही दृष्टिकोनात अजिंक्य आणि शीतलच्या कथेमुळे बदल होतो आहे. माझ्या मेहनतीमुळे मी व्यक्तिरेखेला न्याय देऊ  शकलो व या सर्व गोष्टी घडल्या याचाच मला जास्त आनंद वाटतो.

नितीश चव्हाण (लागिरं झालं जी – झी मराठी)

नागपुरी ठसक्यासाठी सर्व काही –

मी आतापर्यंत सर्वच छोटय़ा-मोठय़ा व्यक्तिरेखेसाठी मेहनत घेतली आहे. त्याचप्रमाणे राधिका या व्यक्तिरेखेसाठी घेतली. एक नागपुरी मुलगी प्रेमविवाह करून मुंबईत स्थायिक होते व पुढे तिच्या आयुष्यात नको त्या गोष्टी घडत जातात. असा तिचा प्रवास मुळात मी समजवून घेतला व त्यावर काम करायला सुरुवात केली. सर्वप्रथम मी भाषेवर मेहनत घेतली. मी आमच्या मालिकेचे संवाद लेखक जे मूळचे नागपूरचे आहेत असे अभिजीत गुरू यांची मदत घेतली.भारत गणेशपुरेंशी सतत नागपुरी भाषेत बोलू लागले. सेटवर व घरी केवळ नागपुरी भाषाच बोलत गेले. या सर्व अपार मेहनतीमुळे मी व्यक्तिरेखेत नागपुरी ठसका आणू शकले शकले. राधिकेचा नवरा गुरुनाथ तिला सारखा तू वेंधळीच आहे असं म्हणत असतो. पण ती वेंधळी नाही. घरातील सर्व काम करून, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडत छोटासा व्यवसाय करणारी तुमच्या- आमच्या घरातील राधिका साकारणं सुरुवातीला खूप आव्हानात्मक होतं. आज राधिके च्या व्यक्तिरेखेमुळे स्त्रियांवर परिणाम होतो आहे. घराचा अर्धा हक्क मागण्याची धमक ग्रामीण भागातील स्त्रियाही दाखवतात या गोष्टी कलाकार म्हणून जेव्हा माझ्यासमोर येतात तेव्हा मी स्वत:च माझी पाठ कौतुकाने थोपटून घेते.

अनिता दाते केळकर (माझ्या नवऱ्याची बायको – झी मराठी)