बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रात आता पुन्हा एकदा सनई-चौघड्यांचे सूर घुमणार आहेत. भारतीय गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) आणि अभिनेत्री सागरिका घाटगे (Sagarika Ghatge) यांनी साखरपुडा केल्याचे वृत्त सोमवारी समोर आले. स्वतः झहीरनेच ट्विट करून त्याच्या आयुष्यातील या नवीन इनिंगची माहिती दिली.

गेल्या काही महिन्यांपासून झहीर आणि सागरिकामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा होत्या. अखेर झहीरच्या ट्विटमुळे या चर्चांना काल पूर्णविराम मिळाला. ३८ वर्षीय झहीर खान सध्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे नेतृत्त्व करतो आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या सामन्यांमध्ये लक्ष केंद्रित करत असल्याने सागरिकाच सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत आहे. भारतीय क्रिकेट संघातील लाजाळू सदस्य समजल्या जाणाऱ्या झहीरला आपल्या प्रेमाची जाहीर कबुली केव्हा द्यायची हे चांगलेच ठाऊक होते. झहीरला प्रेमाने ‘झॅक’ म्हणणाऱ्या सागरिकाने त्यांच्या नात्याबद्दलची माहिती दिली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सागरिका म्हणाली की, ‘झॅकने गुपचूप आमच्या साखरपुड्याची सर्व तयारी केली होती. याबद्दल त्याने मलाही काहीच कल्पना दिली नव्हती. त्याने माझ्यासाठी सुंदर अंगठी घेतल्याचं मला माहिती नव्हतं. झॅकने माझ्या बोटात अंगठी घातली त्या क्षणाचं शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. आमच्या दोघांसाठीही तो क्षण अविस्मरणीय राहिल. आम्ही खूप भाग्यवान आहोत असं मला वाटतं.’

साखरपुडा झाला म्हटल्यावर आता लग्न केव्हा करताय? असा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविकचं आहे. ‘सध्या झॅकला आयपीएल सरावाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आयपीएल संपल्यावर आम्ही यावर चर्चा करू,’ असे सागरिकाने म्हटले. सागरिका ही मराठी मुलगी असली तरीही तिच्यापेक्षा झहीर जास्त चांगल मराठी बोलतो असंही तिनं सांगितलं. ‘आम्ही दोघंही मुळचे महाराष्ट्रातले असल्यामुळे कदाचित एकत्र आलो असू. तो माझ्यापेक्षाही चांगलं मराठी बोलतो. त्याला शाळेमध्ये मराठी  विषय असल्यामुळे या भाषेचं बऱ्यापैकी ज्ञान आहे. याउलट मी बोर्डिंगमध्ये शिकलेय. त्यामुळे मी फक्त घरीच मराठीत बोलायचे. घरीसुद्धा कोल्हापुरी बोलीभाषा असल्यामुळे तिथेही अस्खलित मराठी बोललं जात नाही, असे सागरिकानं सांगितलं.