क्रिकेट विश्वामध्ये अनेकांच्या मनावर राज्य करणारा एक खेळाडू म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचा डोंगर रचणाऱ्या या विक्रमवीराच्या जीवनावर बेतलेला एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटातून मास्टर ब्लास्टरच्या जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळते आहे. अशा या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचं पहिलं गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘हिंद मेरे जिंद’ असे बोल असणाऱ्या या गाण्याला ए. आर. रेहमानने संगीत दिलं असून, गीतकार इरशाद कामिल यांच्या लेखणीतून हे गाणं साकारलं आहे. सचिनच्या वाढदिवसाचा एकंदर माहोल पाहता या उत्साही वातावरणात ‘हिंद मेरे जिंद’ प्रदर्शित करण्यात आलं. हे गाणं ऐकताना पडद्यावर सुरु असणारी दृश्य आणि गाण्याचे बोल यांमुळे एक दर्शक म्हणून आपल्याही अंगावर शहारा येतोच. ए.आर. रेहमानने गायलेलं हे गाणं सर्वार्थाने सचिनच्या आयुष्याची एक झलक आपल्याला दाखवून जातं.

कपिल देव आणि क्रिकेट विश्वातील दिग्गजांना पाहण्यापासून सुरु झालेला सचिनचा प्रवास ते विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने अनुभवलेले ते सर्व क्षण पुन्हा एकदा प्रेक्षकांना जेम्स एरस्किन दिग्दर्शित या चित्रपटातून पाहता येणार आहेत. ‘२०० नॉ़टआऊट’ आणि ‘कार्निवल मोशन पिक्चर्स’ची निर्मिती असणारा हा चित्रपट मे महिन्याच्या २६ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, सर्वांचं जीवापाड प्रेम असणाऱ्या मास्टर ब्लास्टरने चाहत्यांच्या उपस्थितीत त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा केला. मुंबई आणि पुण्याच्या संघादरम्यान खेळवल्या गेलेल्या आयपीएल सामन्यादरम्यान सचिनसाठी मुंबईतील वानखेडे मैदानात उपस्थित असलेल्या क्रिकेटरसिकांनी वाढदिवसांच्या शुभेच्छा देणारे गाणे गायले. या सर्व क्षणांचा आनंद घेत असताना खुद्द सचिनही भारावून गेला होता. सचिनच्या नावाभोवती असणारं वलय पाहता येत्या काळात त्याचा जीवनप्रवास पाहण्यासाठी चित्रपगृहांमध्ये गर्दी होणार हे नक्की.