मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काही आघाडीच्या आणि प्रेक्षकांना नेहमीच आवडणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एक नाव हमखास पाहायला मिळते, ते म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. विविध चित्रपटांच्या माध्यमातून आव्हानात्मक भूमिकांना न्याय देणारी ही अभिनेत्री आणि तिने आजवर साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. अशा या हसऱ्या अभिनेत्रीच्या किताबखान्याची सफर आज आपल्याला घडणार आहे. कलाकार आणि त्यांच्या किताबखान्याचं हे सदर सुरु झाल्यापासून अभिनय क्षेत्रात योगदान देणाऱ्या विविध कलाकारांच्या किताबखान्याची सफर वाचकांना घडली. किताबखान्याच्या पुढच्या टप्प्यावर चला डोकावून पाहूया सोनालीच्या आवडीच्या पुस्तकांमध्ये…

या सदराच्या निमित्तानं आवडत्या पुस्तकाचा विषय निघताच सोनालीने शांता शेळके यांच्या ‘चौघीजणी’ या पुस्तकाचं नाव घेतलं. ‘मला शांता शेळकेंचं चौघीजणी पुस्तक फार आवडतं. मुळात हे एक अनुवादित पुस्तक आहे. पण पुस्तक वाचताना ते अनुवादित असल्याचं जाणवत नाही. त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपलीशी वाटते. इतकंच काय तर पुस्तकात शब्दबद्ध केलेलं बहिणींचं भावविश्वही अप्रतिम आहे. शांताबाईंच्या या पुस्तकातील उत्कट भाव वाचतेवेळी त्यांच्या लेखणीच्या सामर्थ्याचा अंदाज येतो. त्यामुळं ‘चौघीजणी’ माझ्या किताबखान्यातील सर्वात आवडतं पुस्तक आहे.’ असं सोनाली म्हणाली.

या व्यतिरिक्त इतर आवडत्या लेखकांबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, ‘शांताबाईंव्यतिरिक्त इतर लेखकांविषयी सांगायचं झालं तर मला गौरी देशपांडे, मुकुंद टाकसाळे या लेखकांनी लिहिलेलं सर्व साहित्य वाचायला आवडतं. युरोपियन साहित्य फारसं वाचलं नसलं तरी मला हर्मन हेस यांचं ‘सिद्धार्थ’ हे पुस्तक फार आवडतं, असं ती म्हणाली. सध्या सोनाली एक पुस्तक वाचतेय. ते म्हणजे सई परांजपे अनुवादित नसिरुद्दीन शाहा यांचं आत्मचरित्र. ‘ते पुस्तक वाचत असतानाच मला सई परांजपेंच्या लेखणीचीही कमाल वाटते’, असे तिनं सांगितलं.
हल्लीच्या पिढीच्या एकंदर वाचनाच्या सवयीविषयी विचारताच सोनाली म्हणाली, “प्रत्येकाची आवड वेगळी असते. त्यामुळे आपण कोणालाही ठराविक निकषांवर जोखू शकत नाही. पण, इथं एक बाब मला अस्वस्थ करते आणि खंतही वाटते. कोणाशी मराठीत संभाषण करायला गेलं तर इतरांना आपण मराठी बोलण्याचा आव आणत आहोत, असं वाटू लागतं आणि मग काही माणसं अक्षरश: आपल्याकडं चमकून पाहतात.”

भेटवस्तू म्हणून आलेल्या पुस्तकांचीही तिच्या किताबखान्यात बरीच गर्दी आहे. त्यामुळे तिने तर आता पुस्तकांचेही विविध विभाग केले आहेत. कथा, चरित्र, आत्मकथा, कादंबऱ्यांमध्ये रमणारी सोनाली थरारक पुस्तकं वाचण्याला तुलनेने कमी प्राधान्य देत असली तरीही तिच्या वाचनाचा अनुभव दांगडा आहे, असंच म्हणावे लागेल.
शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com