देवदत्त नागे

संध्याकाळी सातच्या ठोक्याला ‘जय मल्हार….’असा आवाज घराघरात घुमू लागतो आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे खंडेराय प्रेक्षकांच्या भेटीला येतात. झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेच्या निमित्ताने घराघरात पोहोचलेल्या देवदत्त नागेचा किताबखाना आज वाचकांसाठी खुला  होत आहे. एक धष्टपुष्ट आण भारदस्त व्यक्तिमत्व असणाऱ्या देवदत्तच्या पुस्तकांचा खजिना न संपणारा आहे असेच म्हणावे लागेल. चला तर मग पुस्तकांना गुरु मानणाऱ्या आणि अनेकांचे विचार पुस्तकांच्या माध्यमातून आत्मसात करणाऱ्या देवदत्त नागेच्या किताबखान्यातील त्याच्या आवडत्या पुस्तकांबद्दल जाणून घेऊया….

शारीरिक सुदृढता, ट्रेकिंग, अभिनय, संगीत अशा विविध क्षेत्रांमध्ये अभिरुची असल्यामुळे मला पुस्तकांची या सर्वामध्ये फारच मदत होते. त्यातही माझ्या सर्वाधिक आवडीची पुस्तकं म्हणायची झाली तर प्रसिद्ध अभिनेते अरनॉल्ड श्वार्जनेगर यांचे ‘द एन्सायक्लोपिडिया ऑफ मॉडर्न बॉडीबिल्डींग’ आणि ‘टोटल रिकॉल’ ही पुस्तकं मला फार आवडतात’, असे देवदत्त म्हणाला. शारीरिक सुदृढतेबद्दल या पुस्तकातून बरीच माहिती मिळते. त्यातही या सर्व गोष्टींचा मी भोक्ता असल्यामुळे या पुस्तकांचे माझ्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे, असेही देवदत्तने स्पष्ट केले. या व्यतिरिक्तही आणखी काही लेखकांची भेट देवदत्तच्या या किताबखान्यात झाली. पु. लं.ची पुस्त्कं मी फारशी वाचली नसली तरीही त्यांना ऐकण्याला मी प्राधान्य देतो. याशिवाय शं.ना.नवरे, सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकांचाही मी चाहता आहे हे सुद्धा देवदत्तने न विसरता स्पष्ट केले. बालपणी वाचलेल्या पुस्तकातील सुपरहिरोचा उपयोग आज खंडेरायांची भूमिका साकारण्यासाठी  होत असल्याचेही तो म्हणाला. संगीतातही बरीच रुची असल्यामुळे त्यासंदर्भातील पुस्तकांचेही वाचन झाले. गिटार वादनासाठी तर मला डॅन मॉर्गन यांच्या गिटार या पुस्तकानेही भुरळ घातली. माझी ट्रेकिंगची आवड पाहता त्यासाठी हरिश कपाडिया यांचे ‘ट्रेक द सह्याद्री’ हे पुस्तक मला भावले, असे देवदत्त नागे म्हणाला.

पुस्तकांसोबतच्या या दृढ नात्याविषयी सांगताना देवदत्तने न विसरता ‘राजा शिवछत्रपती’, ‘छावा’, ‘मृत्युंजय’, ‘राधेय’ या पुस्तकांचाही उल्लेख केला. मुळातच कुटुंबाकडून वाचनाचा वारसा मिळालेल्या देवदत्तच्या कुटुंबात नाही म्हणता वाचनाची आवड जवळपास सर्वांमध्येच रुळली आहे.

तर मग असा होता देवदत्त नागेचा भलामोठा आणि वैविध्यपूर्ण किताबखाना.

सायली पाटील,