किताबखान्याचा प्रवास सुरु होऊन आता बरेच दिवस उलटलेत. पुस्तकं आणि वाचन म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यातही काही कलाकारांसाठी पुस्तकांचं महत्त्व फार. अशाच काही कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता-लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे. विविध कार्यक्रम आणि चित्रपटांच्या माध्यमातून हेमंतनं त्याच्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांच्या मनावर छाप पाडली. अभिनयासोबतच कलाविश्वात या अवलियाने दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रातही आपले नशीब आजमावले…’बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत हेमंतने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर अनेकांचेच लक्ष वेधले. असा हा अभिनेता आज त्याच्या किताबखान्यातील काही पुस्तकांबद्दल आपल्याला सांगत आहे.

‘माझ्या किताबखान्यातील पुस्तकांबद्दल म्हणायचं झालं तर त्यात विविध प्रकारची पुस्तकं आहेत. पण, प्रकाश नारायण संत यांचं ‘वनवास’ हे पुस्तक माझ्या विशेष आवडीचं. या पुस्तकातील लेखन शैली, ‘लंपन’ नावाच्या एका मुलाचं उभं केलेलं भावविश्व, त्याची विचार करण्याची पद्धत आणि एकंदर पुस्तकातील भाषा या साऱ्यामुळे हे पुस्तक मला फार आवडतं. पुस्तकं वाचण्यासाठी मी नेहमीच तयार असतो. पण, रात्रीच्या वेळी, दिवसभराचा ताण दूर सारुन जेव्हा आपण झोपण्याच्या तयारीत असतो तेव्हा मात्र मी गमतीदार पुस्तकं वाचण्याला प्राधान्य देतो’, असे हेमंत म्हणाला.

भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ कादंबरीचा उल्लेख करत हेमंतने हे पुस्तक वाचल्यानंतरचा अनुभव भन्नाट होता, असे म्हणत आपल्याकडे असलेल्या लेखकांचे आणि त्यांनी लिहून ठेवलेल्या साहित्याचे तोंड भरुन कौतुक केले. हल्लीच्या तरुणाईचा पौराणिक पुस्तकं वाचनाकडे वाढणारा कल आणि एकंदर आमिश त्रिपाठीसारख्या लेखकांचे वाढते प्रस्थ याविषयी सांगताना हेमंत म्हणाला, या लेखकांनी पौराणिक कथांना सोप्या पद्धतीने सर्वांसमोर आणलं आहे. त्यामुळे ते समजणं, त्याबद्दलची माहिती जाणून घेणं अधिक सोपं झालं असल्यामुळे या पद्धतीचं वाचन वाढलं आहे. यासोबतच इंग्रजी पुस्तकं, इंग्रजी साहित्य यात उत्तम कामगिरी करत आहे.

एका लेखकाच्या दृष्टीने असणारं पुस्तकांचं महत्त्व सांगत हेमंत म्हणाला, ‘माझ्या लेखनामध्ये पुस्तकांची, वाचनाच्या सवयीची फारच महत्त्वाची भूमिका आहे. इतकंच काय तर, ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटासाठी सुद्धा मला या साऱ्याचा खूपच फायदा झाला होता. मराठी, इंग्रजी अश सर्व प्रकारच्या लेखनसाहित्याविषयी सांगताना हेमंतने त्याचा किताबखाना वाचकांसमोर उलगडून सांगितला. पुढच्या किताबखान्यात कोणत्या कलाकाराचा किताबखाना आपल्या भेटीला येणार हे जाणून घेण्यासाठी वातच राहा माझा किताबखाना.

शब्दांकन- सायली पाटील
sayali.patil@indianexpress.com