बऱ्याचजणांना वाचनाची सवय असते. कोणाला वर्तमानपत्र वाचायला आवडतात, तर कोणाला कादंबऱ्या वाचायला आवडतात. कोण नुसतं विनोदी पुस्तकं वाचण्यास प्राधान्य देतं, तर कोणाची वाचनाची सवयच काही वेगळी असते. अशीच हटके वाचनाची सवय असलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही सालस अभिनेत्री हाडाची वाचक आहे, असं म्हणायला हरकत नाही.

जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर वाचनाच्या सवयींमध्ये काही बदल करत विविध प्रकारच्या पुस्तकांचा मयुरीने आपल्या किताबखान्यात समावेश केला आहे. ‘महाविद्यालयीन दिवसांचं म्हणाल तर मी डॅन ब्राऊन यांच्या लिखाणामुळे फार प्रभावित होते. त्यांची बरीच पुस्तकं वाचून कोणाची कल्पनाशक्ती या पातळीपर्यंत कशी काय पोहोचू शकेल, याचंच अप्रूप मला वाटत होतं. त्यांचं ‘दा विंची कोड’ हे पुस्तक माझ्या फार आवडीचं आहे. त्यांच्यासोबतच स्टेफनी मेयर लिखित ‘ट्वायलाइट’ ही शृंखलासुद्धा मी वाचली आहे. त्यामुळे डॅन ब्राऊन आणि स्टेफनी मेयर हे त्या टप्प्यातील माझे आवडते लेखक होते, असं मयुरी म्हणाली.

cvr

आध्यात्मिक वाचनाकडे कल वाढला त्यावेळी ‘द माँक हू सोल्ड हिज फेरारी’ हे पुस्तक वाचल्याचं सांगत ‘फकिर’ या पुस्तकाचाही मयुरीने न विसरता उल्लेख केला. आध्यात्मासोबतच तिच्या वाचनात काही नाटकंही आली. एका टप्प्यावर बादल सरकार, मोहन राकेश यासारख्या लेखकांची नाटकं वाचण्यातही ती गुंग व्हायची. नाटकं, आध्यात्माची जोड असणारी पुस्तकं आणि काही कादंबऱ्यांच्या गर्दीत मयुरीने पुलं आणि वपुंच्या लेखणीचंही भरभरुन कौतुक केलं. सर्वांप्रमाणेच पुलं माझेही आवडते लेखक आहेत. त्यांच्या लिखाणात असणारी सहजता मला सर्वात जास्त भावते, असं सांगत मयुरीने एक छोटीशी आठवणही शेअर केली. पुलंच्या ‘एक झुंज वाऱ्याशी’ या नाटकाप्रती असणारी ओढ शब्दांत मांडताना मयुरी म्हणाली, ‘पुलंचं हे नाटक फारसं गाजलं नसलं तरीही ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. किंबहुना माझ्या हृदयाच्या जवळच आहे. कारण, एका प्रोजेक्टच्या निमित्ताने या नाटकाचा काही भाग मी सादर केला होता.’
सर्वच प्रकारच्या पुस्तकांचं टप्प्याटप्प्याने वाचन करणारी मयुरी आरोग्यविषयक मुद्द्यांवर भाष्य करणारी पुस्तकं वाचण्यालाही तितकंच प्राधान्य देते. एक अभिनेत्री आणि कलाकार म्हणून प्रगल्भ बनवणाऱ्या या वाचनाच्या बदलत्या सवयींबद्दल आणि त्याला मिळालेल्या आधुनिकतेच्या जोडीबद्दल सांगत तिने स्वत:चं मत मांडलं. ‘किंडलसारख्या नव्या गोष्टी, तंत्र या सर्वांच्या उपलब्धतेमुळे १० पुस्तकं सोबत नेण्यापेक्षा त्या एका ‘किंडल’मध्येच तुम्ही वाचनाचा आनंद घेऊ शकता. अर्थात हल्लीच्या दिवसांत याचं प्रमाण वाढलंय पण नव्या सोयी उपलब्ध झाल्यामुळे काही गोष्टी आणखीनच सोप्या झाल्या आहेत हे नाकारता येणार नाही’,  अशी सकारात्मक बाब मांडण्यावर मयुरीने भर दिला.

‘वाचनाची सवय ही फार महत्त्वाची असून त्यामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो, एक वेगळी दिशा मिळते. त्यामुळे पुस्तकांची पानं उलटणं, त्या पानांचा वास घेणं याची आणि एकंदर वाचनाची जाणीव असणंच फार महत्त्वाचं आहे’, असं सांगत मयुरीने तिचा किताबखाना आटोपता घेतला. एक हाडाची वाचक आणि सालस अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मयुरीचा किताबखाना तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरुर कळवा.

(शब्दांकन- सायली पाटील, sayali.patil@indianexpress.com)