बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये सर्वसाधारणपणे तर्क नसतो. अलीकडे मात्र मधूनमधून तर्कसुसंगत चित्रपट पाहायला मिळतात. ‘ऑफबीट’ म्हणून गणल्या गेलेल्या नीरज पांडे दिग्दर्शित ‘स्पेशल छब्बीस’ हा चित्रपटही तर्कसुसंगत गटातील असून वेगवान, टोकदार दिग्दर्शन आणि उत्कंठावर्धक कथानक यामुळे प्रेक्षकांना आवडू शकतो.
पी के शर्मा (अनुपम खेर), अक्षयकुमार (अजय सिंग), जोगिंदर (राजेश शर्मा) आणि इकबाल (किशोर कदम) अशा चौघेजण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून गैरमार्गाने पैसे करणारे, नफाखोरी करणारे, भ्रष्टाचारी राजकारणी, धनदांडगे उद्योगपती, जवाहिरे यांसारख्या लोकांना लुटतात. कधी सीबीआय, कधी प्राप्तिकर विभाग अशा सरकारी खात्यांचे अधिकारी असल्याची बतावणी करून धनदांडग्यांच्या घरी छापा घालणे आणि सगळी संपत्ती लुटून नेणारी ही चौघांची टोळी असते. मला कोणीही पकडू शकत नाही अशी मिजास असलेल्या अजय सिंगला खरोखरीचा सीबीआय अधिकारी वसीम खान (मनोज बाजपेयी) भेटतो तेव्हा काय घडते त्याभोवती चित्रपट आहे.
वास्तविक वाममार्गानेच फक्त गडगंज संपत्ती मिळू शकते यावरच विश्वास असलेले हे चौघेजण वाममार्गानेच जनतेची लूट करणाऱ्या राजकारणी, नफेखोरी करणारे उद्योगपती, जवाहिरे यांना लुटतात. सर्वसामान्य प्रेक्षकाला त्यामुळेच हे चौघे न आवडले तरच नवल. कारण मुळात ते चोर-लुटारू नव्हते हे स्पष्ट करणारी चौघांचीही पाश्र्वभूमी नेमकेपणाने दाखविण्यात दिग्दर्शक चांगलाच यशस्वी झाला आहे.
पी के शर्मा हा मध्यमवयीन कुटूंबवत्सल माणूस आहे. त्याला खूप सारी अपत्ये आहेत. चंदीगढमध्ये राहणाऱ्या या शर्माच्या मोठय़ा मुलीचे लग्नही नुकतेच झाले आहे. चित्रपटाचा नायक अर्थात अजय सिंग हा तसे पाहिले तर सडाफटिंग आहे परंतु मुंबईत तो राहत तिथल्या कॉलनीतल्या एका मराठी तरुणीवर त्याचं प्रेम आहे. नोकरी मनासारखी मिळत नाही म्हणून आपण अशा ‘इण्टेलिजेण्ट’ पद्धतीने चोऱ्या करतो असे अजय सिंग तिला सांगतो. त्याच्यावर प्रेम असल्यामुळे तीही हे मान्य करते. चौघांपैकी इक्बाल आणि जोगिंदर यांचेसुद्धा सर्वसामान्य कुटूंब आहे. चोर असले म्हणून काय झाले आम्ही लुटतो तर धनदांडग्या, नफेखोरी करणाऱ्या लोकांनाच असे या चौघांचे ‘तत्वज्ञान’ आहे. दिग्दर्शकाने हे अतिशय नेमकेपणाने दाखविल्यामुळे प्रेक्षकही या चोऱ्यांमध्ये जणू सामील होत जातो.
मुळात या कथानकामध्ये नायिकेची अजिबात गरज नव्हती असे वाटेलही. परंतु, अन्य तिघांप्रमाणेच अजय सिंगला गडगंज पैसा कुणासाठी कमवायचा याचे कारण प्रेक्षकाला पटविता यावे म्हणूनच प्रिया चव्हाण (काजल अग्रवाल) हिची व्यक्तिरेखा दिग्दर्शकाने आणली आहे. बॉलीवूडचा फॉम्र्युला, सर्वसामान्य प्रेक्षकांची विचार करण्याची चौकट लक्षात घेऊन आपल्याला जे नेमकेपणाने दाखवायचे आहे, नमूद करायचे आहे ते करावे असा विचार दिग्दर्शकाने केला असावा. नाटय़पूर्ण उत्कंठावर्धक कथानक नेमकेपणाने सादर करताना त्याला १९८७ साली घडलेल्या मुंबईतील बडय़ा ज्वेलर्सचे दुकान लुटून नेले होते ही सत्य घटना चित्रपट करण्यामागची दिग्दर्शकाची प्रेरणा आहे. सुरुवातीलाच पडद्यावर १९८७ सालच्या घटनेचा उल्लेख येतो आणि चित्रपट लगेच सुरू होतो.
अक्षय कुमारच्या प्रतिमेला छेद देणारा चित्रपट असल्यामुळे त्याच्या कारकिर्दीतीलही हा महत्त्वाचा चित्रपट ठरावा. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाचे चार नायक आहेत आणि त्यापैकी एक अक्षय कुमार आहे हेही प्रेक्षकाच्या मनावर ठसविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलाय.  अक्षय कुमारनेही आपण प्रमुख नायक नाही आहोत तर चौघांच्या टीममधील एक नायक आहोत हे समजून अभिनय केला आहे. चित्रपटातली गाणी नसती तरी चित्रपटाने प्रेक्षकांना आकर्षित केले असते. अनुपम खेरने नेहमीप्रमाणे या भूमिकेतही संयत अभिनय केला असून मनोज बाजपेयीने साकारलेला वसीम खानही त्याच्या पोलीसी खाक्यामुळे, टेचात चालण्याच्या ढबीमुळे अप्रतिम साकारला आहे. इन्स्पेक्टर रणवीर सिंग अर्थात जिमी शेरगिलने साकारलेली ही व्यक्तिरेखा हा चित्रपटाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला आहे. बॉलीवूडच्या तद्दन गल्लाभरू स्टाईलपेक्षा वेगळा आणि गमतीदार अनुभव देणारा हा चित्रपट प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो हे मात्र नक्की. चित्रपटात गाणीही हवीत, मारधाडही हवी, थोडीशी भावनिक ओलावा दाखविलेली दृश्ये हवीत, कॉमेडी पण हवी अशा नवरसांची अपेक्षा असलेल्या प्रेक्षकांना मात्र पडद्यावर चाललेल्या हालचाली पाहून वैतागही येऊ शकतो. अक्षय कुमारच्या चाहत्यांची मात्र निराशा होणार नाही हेही नक्की.

स्पेशल छब्बीस
निर्माते – वायकॉम१८ पिक्चर्स, कुमार मंगत, फ्रायडे फिल्मवर्क्‍स
दिग्दर्शक -नीरज पांडे
छायालेखक – बॉबी सिंग
संकलक – श्री नारायण सिंग
संगीत – एम एम किरावानी, हिमेश रेशमिया, चंदन शर्मा
कलावंत – अक्षय कुमार, मनोज बाजपेयी, काजल अग्रवाल, दिव्या दत्ता, अनुपम खेर, जिमी शेरगील, किशोर कदम, राजेश शर्मा, विपीन शर्मा व अन्य.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे