हिंदी सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केलेल्या प्रियांकाने आपल्या कक्षा रुंदावत आपल्या नावाचा दबदबा सातासमुद्रापार पोहोचवला. प्रियांकासारखी दुसरी कोणीच असू शकत नाही, असा विश्वास तिच्या चाहत्यांना आहे. पण पाकिस्तानमध्ये प्रियांकासारखी दिसणारी एक व्यक्ती आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. सध्या तिच्याच नावाची चर्चा सिनेवर्तुळात होताना दिसत आहे.

पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री झालय सरहदीने एका मुलाखतीत खुलासा केला की, तिची तुलना नेहमीच प्रियांका चोप्राशी केली जाते. तिने प्रियांकासाठी ‘बॉडी डबल’ म्हणून काम करावं अशी विचारणा तिला करण्यात आली होती. सरहदीने सांगितले की, मी तेव्हाच माझ्या करिअरला सुरुवात केली होती जेव्हा पाकिस्तानमध्ये भारतीय चॅनलवर बंदी घालण्यात आली होती आणि प्रियांका मिस वर्ल्ड बनली होती. मला अजूनही आठवतं मी एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना मी प्रियांका असल्याचेच वाटत होते. तेव्हापासून आतापर्यंत अनेकजण मला मी प्रियांकासारखी दिसते असेच म्हणतात. मला आता असंही वाटतं की, खुद्द प्रियांकालाही माझ्याबद्दल कळलं असेल.