दर्जेदार दिग्दर्शकाची लक्षणे कोणती?, हा प्रश्न जर एखाद्या चित्रपट समीक्षकाला विचारला तर तो दिग्दर्शक हुशार, सर्जनशील आणि अभिनयाची जाण असणारा असावा असे पारंपरिक उत्तर देईल. पण प्रत्येक उत्तम दिग्दर्शक या व्याख्येत बसेलच असे नाही. ऑस्कर पुरस्कार विजेते मेल ब्रूक्स हेदेखील असेच वेगळ्या धाटणीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. कमीत कमी श्रमात अगदी मठ्ठ अभिनेत्याकडूनही अपेक्षित अभिनय करून घेण्याची कला त्यांच्याजवळ आहे. आणि याच्याच जोरावर त्यांनी ‘यंग फ्रँ कन्स्टाइन’, ‘हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड’, ‘रॉबिन हूड’ यांसारखे एकाहून एक सरस असे चित्रपट तयार केले. ‘ब्लेजिंग सॅंडल्स’ हा त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट आहे. परंतु आज त्यांना या चित्रपटाची पुन:निर्मिती करणे शक्य होईल असे त्यांना वाटत नाही. त्यांनी नुकत्याच एका रेडिओ स्टेशनला विनोदी साहित्य या विषयावर मुलाखत दिली. त्यात त्यांनी आपल्या सिनेकारकीर्दीतील गमतीदार अनुभव श्रोत्यांपुढे मांडले. विनोदी चित्रपटांत झालेल्या बदलांबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केले. विनोदी साहित्याची निर्मिती ही अत्यंत कठीण बाब आहे. कारण विनोद योग्य रीतीने मांडता आला नाही तर मांडणाऱ्यांचेच हसू होते. विनोद हा साधा, सोपा आणि सहज असावा. तो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वाना समजेल असा असावा. पण दुर्दैवाने आज विनोदाची परिभाषा बदलली आहे, असे त्यांना वाटते. त्यांना सध्याच्या चित्रपटांमध्ये कमकुवत कथा आणि सुप्त राजकीय उद्देश आहेत की काय अशी शंका येते. आणि अशा वातावरणात विनोदी चित्रपटांची निर्मिती आपण करू शकू असे त्यांना वाटत नाही.