१ फेब्रुवारी १९९१ हा दिवस फक्त आणि फक्त अमिताभ बच्चनचा होता. तसे त्या काळात बऱ्यापैकी त्याचेच दिवस होते. मात्र हा दिवस दोन गोष्टींमुळे त्याच्यासाठी लक्षात राहिला. रोमेश शर्मा निर्मित, मुकुल आनंद दिग्दर्शित ‘हम’ चित्रपट या दिवशी झळकला. त्यावेळी अमिताभना एका जबरदस्त यशाची गरज होती. ‘गंगा जमुना सरस्वती’, ‘तुफान’, ‘जादुगर’ अशा बडय़ा चित्रपटांच्या अपयशामुळे अमिताभची गल्लापेटीवरील स्थिती काळजीयुक्त होती. ‘आज का अर्जुन’ चित्रपट चालला मात्र त्या यशाला प्रतिष्ठा नव्हती. ‘हम’ प्रदर्शित होण्याआधीच ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या गाण्याला वादळी लोकप्रियता मिळाली होती. समीक्षकांच्या मिश्र प्रतिसादात त्यावेळी ‘मेट्रो’मध्ये ‘हम’ झळकला. त्याच दिवशी संध्याकाळी ‘हम’च्या स्वागताचा अमिताभच्या देहबोलीवर कसा परिणाम झाला हे प्रत्यक्षात पाहण्याचा सुयोग आला. निमित्त होते ते ‘एकापेक्षा एक’ या चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे..रौप्यमहोत्सवी सोहळ्यासाठी निर्माते सतीश कुलकर्णी यांनी जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलची निवड केली होती. त्यावेळी मराठी चित्रपटांच्या मुहूर्तापासून ते रौप्यमहोत्सवी सोहळ्यापर्यंत सर्व कार्यक्रम प्रामुख्याने दक्षिण आणि मध्य मुंबईत होत असत. ती ‘चौकट’ मोडण्याचे श्रेय सतीश कुलकर्णी, किरण शांताराम यांच्यासारख्या निर्मात्यांक डे जाते.

सतीश कुलकर्णीनी जीतेंद्रच्या उपस्थितीत ‘नवरी मिळे नवऱ्याला’, शत्रुघ्न सिन्हाच्या हस्ते ‘गंमत जंमत’चा रौप्यमहोत्सवी सोहळा केला होता. त्यावेळी मराठीच्या अंगणात हिंदीचा तारा ही दुर्मीळ गोष्ट होती. त्यामुळे ‘एकापेक्षा एक’साठी अमिताभ यांचा होकार मिळवण्यासाठी त्यांनी फार धडपड केली. ‘गंमत जंमत’च्या वेळी अमिताभना आणणे शक्य नव्हते. ते त्यांनी ‘एकापेक्षा एक’च्या निमित्ताने साधले. शाल घेतलेला अमिताभ आला आणि सुप्रिया पिळगावकरपासून ते सुकन्या कुलकर्णीपर्यंत सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. तो ‘क्षण’च तसा होता. मराठी चित्रपटसृष्टीतील ही अमिताभची पहिली उपस्थिती होती. त्यावेळी खरे म्हणजे अमिताभच्या चेहऱ्यावर ‘हम’च्या यशाचा आनंद असायला हवा होता. मात्र त्यावेळी अमिताभ यांच्या वागण्या-बोलण्यात कु ठेही अ‘हम’पणा झळकत नव्हता. त्याही सोहळ्यात त्याने त्याच्या शुद्ध हिंदी भाषेत थोडक्यात भाषण के ले. योग्य शब्दांची निवड, सुसंस्कृत आणि सकारात्मक बोलणे हे अमिताभचे नेहमीच वैशिष्टय़ राहिले आहे. खरेतर, अशा सोहळ्यांमध्ये स्वत:ची शेखी मिरवणारेच कलाकार खूप आढळतात. अमिताभने मात्र प्रसंगाचे भान राखत आपल्या चित्रपटाविषी चकार शब्द काढला नाही. उलट या सोहळ्यातील प्रत्येकजण अमिताभ भेटीने आनंदून गेला होता तर खुद्द अमिताभही उत्साहाने प्रत्येकाच्या सत्कारात रमले होते. कार्यक्रम संपताच कुठेही न रेंगाळता अमिताभ घरी निघालेदेखील.. मात्र त्यांच्या भेटीच्या ‘एकापेक्षा एक’ आठवणी कित्येक दिवस मराठी चित्रपटसृष्टीत रेंगाळत होत्या.