स्त्रिया म्हणजे दु:खी, बिचाऱ्या या समजुतीला छेद देणारी ‘मेन द रिअल व्हिक्टिम्स’ ही मालिका आहे. रणबीर कपूरसुद्धा ही सीरिज फॉलो करतो एवढं सांगितलं तरी या मालिकेच्या लोकप्रियतेची कल्पना येईल.

मागे कोलंबसवरील एक विनोद फार पसरला होता. कोलंबसला जर मराठी बायको असती तर तो कधीही अमेरिकेचा शोध लावू शकला नसता. कारण त्याच्या बायकोने सतत ‘कुठे चालला आहेस? कशाला जातोय? जाण्याची गरज आहे का? सोबत कोण कोण येतंय? परत कधी येणारेस? इतके जण जाताहेत तर तुला जायची गरज काय? असे सगळे प्रश्न विचारले असते. हे प्रश्न ऐकून बिचारा कोलंबस शेवटी बायकोला हात जोडून बोलला असता, ‘नाही जात मी बाई कुठे! थांबतो तुझ्याजवळच! पण तुझे प्रश्न, सूचना आवर आता!
खरंच ‘मेन’ आर द रिअल व्हिक्टिम्स! नॉट वुमेन!! या विषयावरच एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय वेब सीरिज आहे- ‘मेन द रिअल व्हिक्टिम्स’! अगदी मराठीत सांगायचं तर ‘ऐक पुरुष जन्मा तुझी कहाणी!

मोहित हुसेनने दिग्दर्शित केलेली आणि त्याच्या बायकोसोबत मिळून लिहिलेली ही संकल्पना आहे. छवी मित्तल ही मोहित हुसेनची बायको हिंदी टीव्ही प्रेक्षकांना परिचित आहे. पण ती फक्त अभिनेत्रीच नाही तर गायिकाही आहे. तिने काही सेलेब्सच्या गायन स्पर्धेत भाग घेतला होता. एका टीव्ही मालिकेचं गाणंही गायली आहे. पण ती लेखिकाही आहे हे या वेब सीरिजमुळे कळलं. खरं सांगायचं तर छवी मित्तल ही आजवर चेहऱ्यावरून माशीही न उडणारी, सपाट चेहऱ्याने अभिनय करणारी अभिनेत्री वाटली होती.

पण नवऱ्याने दिग्दर्शित केलेल्या ‘मेन आर द रिअल व्हिक्टिम्स’ या सीरिजमध्ये तिने प्रमुख भूमिका केलीये आणि तिचं काम बघून आश्चर्यचकित झालो. अगदी चुलबुली, फ्रेश वाटलीये. पण सगळ्यात जबरदस्त काम केलंय ते करण वीर मेहराने. आजवर त्याला ठरावीक सास-बहू हिंदी मालिकांमध्ये बघितलं होतं. पण तो इतका सहज आणि अप्रतिम अभिनय करू शकतो हे या वेब सीरिजमध्ये कळलं.
ही सीरिज आहे प्रेमळ नवरा अश्विन आणि पझेसिव्ह बायको शालिनीची. सतत त्याच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणारी, अश्विनला सतत गृहीत धरणारी, थोडी अखडू, नवऱ्याबाबत खूपशी असुरक्षित असलेली ही शालिनी. तर अश्विन अगदी तिचे मूड्स सांभाळणारा, तिच्यावर प्रेम करणारा असतो. पण दरवेळी तिच्या पझेसिव्हनेसमुळे याला त्रास होतो. अशी ही पूर्णपणे विनोदी सीरिज, विषय खूप नवा नसूनही ट्रीटमेंट, विषयाची हाताळणी मात्र खूप नवी टवटवीत आहे.

अश्विन-शालिनीच्या महाबळेश्वर ट्रिपचे पाच एक भाग आहेत ते या सीरिजचे सर्वोत्तम म्हणता येतील. यातील विमान प्रवासाचा भाग तर अगदीच मस्त आहे. नवरात्रातील दांडियाचा भाग, त्याच्या मैत्रिणींना त्याचे लांब केस आवडतात म्हणून जबरदस्तीने केस कापायला लावणं, क्रिकेटवरचा भाग, शॉपिंगचा भाग असे अनेक खुसखुशीत भाग या सीरिजचे आहेत.

नवरा-बायकोमधील अगदी रोजचे विषय या वेब सीरिजमध्ये हाताळले आहेत. अगदी सहज विषय ज्याच्याशी नवरा-बायको वा नात्यात असलेली जोडपी स्वत:ला जोडू शकतात असे छोटे नेटिसोड्स यात आहेत. या सीरिजचं वेगळंपण असं की यातील भाग फक्त दहा किंवा पंधरा मिनिटांचेच आहेत. त्यामुळे या सीरिजचे बरेच भाग आहेत. आणि एकही नेटिसोड हा कंटाळवाणा नाही. संवाद, अभिनय, विषय सर्वच अप्रतिम. अश्विन आणि शालिनी या जोडप्याने अगदी जिंकलंय. कोणाचाही कधी मूड चांगला नसला की ही सीरिज बघावी आणि खूश व्हावं.

‘मेन द रिअल व्हिक्टिम्स’ या वेब सीरिजची लोकप्रियता वाढतेय. अगदी रणबीर कपूरसुद्धा ही सीरिज फॉलो करतो. अश्विन आणि शालिनीची जोडी म्हणजे शंभर टक्के मनोरंजन. त्यामुळे पुरुष जन्माच्या या कहाणीला अनेक जण नक्की रिलेट करतील.

response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा