तामिळ सिनेमा ‘मर्सल’वरुन सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. अभिनेता विजयचा ‘मर्सल’ सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. मात्र, या सिनेमात जीएसटीविषयी नकारात्मक भाष्य करण्यात आल्याने भाजपने ‘मर्सल’ला विरोध दर्शवला. भाजपच्या वाढत्या दबावापुढे झुकून सिनेमाच्या निर्मात्यांनी जाहीर माफीही मागितली. पण ज्या संवादावरून हा वाद सुरू झाला, तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विजयच्या या सिनेमाची तामिळनाडूत जोरदार चर्चा आहे. एकीकडे हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत असताना दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोधही पत्करावा लागत आहे.

‘सिनेमातील काही दृश्ये जीएसटी आणि डिजिटल इंडियाविषयी गैरसमज निर्माण करु शकतात. त्यामुळे ती दृश्ये वगळण्यात यावी,’ अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष टी. एन. सौंदरराजन यांनी केली होती. मात्र, अभिनेते रजनीकांत यांनी सिनेमाचे कौतुक केले. ‘महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य… उत्तम… मर्सल टीमचे अभिनंदन’, असे ट्विट त्यांनी केले होते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत आणि भाजपच्या जवळकीची मोठी चर्चा होती. मात्र, आता रजनीकांत यांनी ‘मर्सल’ला पाठिंबा दर्शवत ‘भाजप’विरोधात भूमिका घेतली आहे.

भाजपने या संवादावर आक्षेप घेतला असला तरीही राहुल गांधीसह अभिनेते कमल हसन, रजनीकांत आणि बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर भाजपचे प्रवक्ते असलेल्या नरसिंह राव यांनी चित्रपटावर टीका केल्यानंतर अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरही संतापला होता. त्याने ट्विटरवरून नरसिंह राव यांना प्रत्युत्तर दिले होते.

कोणत्या दृश्यांवर भाजपचा आक्षेप?
चित्रपटातील दोन दृश्यांवर भाजपला आक्षेप आहे. यातील पहिल्या दृश्यात एक पाकिटमार चित्रपटातील नायक अर्थात विजयच्या खिशातील पाकीट चोरतो. पण डिजिटल इंडियामुळे पाकिटात पैसे नाही, असे या दृश्यात म्हटले आहे. तर दुसऱ्या दृश्यात नायकाने सिंगापूर आणि भारतातील जीएसटीची तुलना केली आहे. सिंगापूरमध्ये ७ टक्के जीएसटी असून तिथे लोकांना मोफत उपचार मिळतात. पण भारतात २८ टक्के जीएसटी भरुनही लोकांना मोफत उपचार मिळत नाही, असे नायक म्हणतो.