संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचविणारा ‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन हे संगीत क्षेत्रातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व आहे. रहस्यमय जीवन जगणाऱ्या या सुपरस्टारच्या जीवनशैलीचे चाहत्यांना प्रचंड आकर्षण आणि कौतुक होते. माध्यमांनाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून काही खळबळजनक तथ्य बाहेर काढण्याचा प्रयत्न माध्यमांनी वारंवार केला आहे. २००९ साली अनपेक्षितरीत्या मायकल जॅक्सनचे निधन झाले. त्याचा मृत्यूदेखील रहस्यमयच होता. आज तब्बल नऊ वर्षांनंतरही या रहस्यावरील पडदा काही केल्या उघडलेला नाही. रोज त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यामधून कोणी ना कोणी व्यक्ती अधूनमधून माध्यमांसमोर येते आणि त्याच्या मृत्यूबाबत भाष्य करते. अशाच लोकांपकी एक मायकल जेकब्शन याने मायकल जॅक्सनच्या मृत्यूबाबत काही खळबळजनक वक्तव्य केले आहे.३४ वर्षीय जर्मन उद्योजक मायकल जेकब्शन हा जॅक्सनचा जुना मित्र होता. त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जॅक्सनच्या मृत्यूबाबत काही खुलासे केले आहेत. मृत्यूपूर्वी मायकलने त्याच्याशी संपर्क साधून त्याला भेटण्याची विनंती केली होती. आपल्याला कोणीतरी ठार मारण्याचा प्रयत्न करत असून ती व्यक्ती कोण आहे याबाबत चर्चा करायची असल्याचे त्याने जेकब्शनला सांगितले होते. दरम्यान, मायकलने स्वत:च्या हातांनी लिहिलेली १३ पत्रे त्याला पाठवली. या पत्रांत आपल्याला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे उल्लेख आहेत. त्यानंतर जेकब्शनने लास वेगास येथे जॅक्सनची भेट घेतली. त्या वेळी मायकल मानसिकदृष्टय़ा पूर्णत: खचला होता. त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज होती, अशा काही खळबळजनक गोष्टी आता मायकल जेकब्शनने उघड केल्या आहेत.मात्र, जॅक्सनच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी माध्यमांसमोर येण्याचे कारण काय?, या प्रश्नावर जेकब्शन काहीसा गडबडला. याआधी माध्यमांसमोर येण्याचा विचार केला होता, पण मायकलची मुले लहान असल्यामुळे आपल्या भावनांवर आवर घातला. कारण इतक्या लहान वयात त्याच्या मुलांना वडिलांच्या मृत्यूचे कारण कळले असते तर त्यांना मानसिक धक्का बसला असता आणि आपल्या सर्वात जवळच्या मित्राचे कुटुंब असे उद्ध्वस्त होताना मी पाहू शकलो नसतो, असे उत्तर त्याने दिले आहे. मायकल जॅक्सनच्या नावाभोवती कायम प्रसिद्धीचे वलय होते आणि त्याचाच फायदा त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी चच्रेत राहण्यासाठी करत असतात. त्यामुळे मायकल जेकब्शन हेही याच गर्दीतील एक नाव असावे, असाच कयास सध्या बांधला जातो आहे.