अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याकडे सर्व जगाचे लक्ष लागून आहे. शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला बॉलिवूड मंडळींनी रंग भरल्याचे पाहायला मिळाले. अमेरिकेच्या भूमीवर एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. बॉलिवूड पार्श्वगायक मिका सिंगने डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पूर्व संध्येला रंगलेल्या मैफलीचा एक फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिका हा डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हिच्या सोबत दिसत आहे. ट्रम्प  यांनी दिलेल्या आदरातिथ्याबद्दल त्याने ट्रम्प यांचे आभार देखील मानले.

पार्श्वगायक मिका सिंगसह बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मनस्वी ममगई देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती. मिका सिंग आणि मनस्वीच्या नेतृत्वाखाली ३० जणांच्या टीमने या कार्यक्रमात धम्माल केली. वॉशिंग्टनमधील लिंकन मेमोरियल व जे.एफ.के. मेमोरियल येथे निरनिराळ्या कला पथकांकडून सादरीकरण करण्यात आले. या सोहळ्यासाठी १,२०० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. यापूर्वी मनस्वी ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसली होती. बॉलिवूड स्टाईलमध्ये या कार्यक्रमादरम्यान अनेकांचेच मनोरंजन झाल्याचे दिसून आले. यापूर्वी मनस्वीने ट्रम्प यांना पाठिंबा देत भारताच्या दृष्टीने ते अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वोत्तम राष्ट्राध्यक्ष ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.

डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारीला अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. मनस्वी भारताची रिपब्लिकन हिंदू कोलिशनची अॅम्बेसेडर असून ट्रम्पदेखील रिपब्लिकन पक्षाचे आहेत. मिका सिंग आणि मनस्वीशिवाय इतरही कलाकारांनी शपथविधीपूर्वी आयोजित कार्यक्रमामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले.