दुरदर्शनच्या माध्यमातून कॅप्टन व्योमच्या भूमिकेत घराघरामध्ये पोहोचलेल्या मिलिंद सोमणने सातासमुद्रापलिकडे तिरंगा फडकविला आहे.  वयाची पन्नाशी पार केलेल्या सोमणने ३ दिवसात ५१७ कि.मी. अंतराची मॅरेथॉन स्पर्धा पार केली आहे. फ्लोरेडा शहरात पार पडलेली  ही मॅरेथॉन स्पर्धा जगातील सर्वात कठीण स्पर्धा समजली जाते. तुम्ही ४२ कि.मी मॅरेथॉन विषयी ऐकले असेल. पण ‘अल्ट्रामॅन’ ही जगातील सर्वात कठीण अशी मॅरेथॉन आहे. या स्पर्धेमध्ये पोहणे, धावणे आणि सायकलिंग असे तीन टप्पे स्पर्धकाला पार करावे लागतात. ज्यामध्ये पहिल्या दिवशी १० कि.मी. पोहणे आणि १४२ कि.मी. सायकलिंग करणे,  दुसऱ्या दिवशी २७६ कि.मी. सायकलिंग तर तिसऱ्या दिवशी ८४ कि.मी. धावावे लागते.

मिलिंद सोमणच्या व्यतिरिक्त ४ भारतीयांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत ही स्पर्धा पूर्ण केली. अभिषेक मिश्रा, कौस्तुभ रडकर, पृथ्वीराज पाटील आणि मनमध रेबा अशी या भारतीयांची नावे आहेत. विशेष म्हणजे मिलिंदने ही मॅरेथॉन अनवाणी पूर्ण केली. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर मिलिंदने, ‘मी आनंदी असून भारतीय असल्याचा मला अभिमान आहे, असे त्याने म्हटले. प्रेमळ जगाने अल्ट्रामॅन मिलिंदला हॅलो म्हणावे, अशा शब्दात त्याने आपल्या भावना फेसबुकवरुन व्यक्त केल्याचे दिसते. या भावनिक पोस्टसोबतच मिलिंदने आईसोबत आणि भारतीय राष्ट्रध्वज हातामध्ये घेऊन काही फोटो शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘अ माऊथ फुल ऑफ स्काय’ या मालिकेपासून ते २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंगच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटापर्यंत अनेक चित्रपटात सोमण दिसला आहे. मिलिंदने एका मुलाखतीमध्ये आपल्या शरिरयष्टीबद्दल सांगितले होते. त्यावेळी मिलिंद म्हणाला होता की, शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्याने कधीही जीममध्ये जाऊन मेहनत घेतलेली नाही. मात्र वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अल्ट्रामॅन स्पर्धा पूर्ण करुन सोमणने त्याची शारीरिक क्षमताच सिद्ध केली असे म्हणावे लागेल. मॅरेथॉनपासून ते जगातील सर्वाधिक कठीण स्पर्धा असणाऱ्या अल्ट्रामॅन स्पर्धेतील दिमाखदार कामगिरीने मिलिंद कौतुकास पात्र ठरला आहे.

२०१५ मध्ये आयर्नमॅन चॅलेंज ही स्पर्धा १५ तास आणि १९ मिनिटात पूर्ण केली होती. यावेळी त्याला ‘आयर्न मॅन ऑफ इंडिया’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या स्पर्धेचे स्वरुप हे ३.८ कि.मी. पोहणे, १८०.२ कि.मी. सायकलिंग आणि ४२ कि.मी. धावणे असे होते.