ऐ दिल है मुश्कील या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ द्यावे अशी विनंती करण जोहरने केली असली तरी मनसे मात्र अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. करण जोहरला उशीरा जाग आली असून चित्रपटाला आमचा विरोध कायम आहे असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिले आहे.

माझ्यासाठी देश महत्त्वाचा असून देशाच्या जवानांना मी सलाम करतो अशी भावनिक प्रतिक्रिया देत करण जोहरने मौन सोडले होते. यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असेही त्याने जाहीर केले. ऐ दिल है मुश्कील सिनेमासाठी ३०० जणांनी मेहनत घेतली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्या अशी विनंती करण जोहरने केली होती. करणच्या स्पष्टीकरणानंतर हा वाद शमेल आणि ‘ऐ दिल..’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होईल अशी आशा होती. पण मनसेने मात्र त्यांची विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे. करण जोहरला उशीरा जाग आली, ऐवढ्या दिवसात त्याला हे सगळे लक्षात का आले नाही असा प्रश्न खोपकर यांनी उपस्थित केला आहे. तर शालिनी ठाकरे यांनीदेखील आमचा विरोध कायम असेल असे स्पष्ट केले आहे.

दिवाळीत प्रदर्शित होणा-या ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाचा करण जोहर निर्माता आणि दिग्दर्शक आहे. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हादेखील आहे. उरी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात असंतोष पसरला आहे. पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे ‘ऐ दिल है मुश्कील’चे प्रदर्शनच आता ‘मुश्कील’ झाले आहे. सिंगल स्क्रीन थिएटर चालकांनी पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट दाखवणार नाही असे जाहीर केले आहे. तर मल्टीप्लेक्स चालकांनी हा चित्रपट दाखवल्यास ‘फटाके’ फुटतील असा सूचक इशाराच मनसेने दिला आहे.