महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) ओळख ही नेहमीच गुंडांचा पक्ष अशीच राहिलेली आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी मनसेवर हल्लाबोल चढवला. ते गुरूवारी नवी दिल्लीतील गृहमंत्रालयाचे मुख्यालय असणाऱ्या नॉर्थ ब्लॉक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सध्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बाबुल सुप्रियो यांच्या नेतृत्त्वाखाली बॉलीवूडमधील निर्मात्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी बाबुल सुप्रियो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसेवर जोरदार हल्ला चढवला. मनसेला चित्रपटगृहात गोंधळ घालण्याचा कोणताही हक्क नाही. मनसे हा पक्ष नेहमीच गुंडाचा पक्ष म्हणून ओळखला गेला आहे, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले. त्यामुळे आता मनसे आता बाबुल सुप्रियो यांच्या आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर निर्माता मुकेश भट्ट यांनी आता आपण सुरक्षेविषयी निश्चिंत झाल्याचे सांगितले. मुंबईतील परिस्थिती आमच्या हाताबाहेर जात आहे, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्थेच्या मर्यादेत राहावी . कोणतीही हिंसा होऊ नये.

सर्वांची दिवाळी आनंदाची जावो. गृहमंत्र्यांनी आम्हाला विश्वास दिला आहे. कायदा आणि गृहमंत्रालय आमच्याबरोबर आहे, असे मुकेश भट्ट म्हणाले. गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून या चित्रपटाला पूर्ण संरक्षण देण्याची हमी दिली आहे. असे मुकेश भट्ट यांनी स्पष्ट केले. मनसे कार्यकर्ते आमचे बांधवच आहेत. आपण सारे गांधीजींच्या भारतात राहतो, त्यामुळे आपण अहिंसेच्या मार्गावर चालले पाहिजे. तसेच पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट आणि वाहिन्यांवर बंदी घातल्यामुळे आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही असेही ठाम मत त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडले.