उरी हल्ल्याला आता काही दिवस उलटले असले तरीही या हल्ल्याचे पडसाद सर्वच क्षेत्रांध्ये पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. मनसेच्या या मागणीमुळे भारतात आलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या बॉलिवूड कारकीर्दीवर एक प्रकारचे सावट आले आहे. त्यानंतर आज मनसे कार्यकर्त्यांनी करण जोहरच्या ऑफिसबाहेर निरर्शने करत ‘करण जोहर हाय हाय’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघा महिना राहिला आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा पवित्रा मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान असल्याने हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तसेच, पाकिस्तानी कलाकार जर भारतात लपून बसले असतील तर त्यांना हुसकावून लावण्यात येईल, अशी धमकीही काही दिवसांपूर्वी मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली होती. त्यामुळे मनसेच्या अल्टिमेटमवर चित्रपटसृष्टीची काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जम्मू काश्मीर मधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे १८ जवान शहीद झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्याची सूचना केली होती. तसेच पाकिस्तानबद्दल केंद्र सरकार घेत असलेल्या नरमाईच्या धोरणावरही त्यांनी टीका केली होती. आता यात मनसेनेही उडी घेतली असून त्यांनी पाकिस्तानी कलाकारांना काही दिवसांपूर्वीच अल्टिमेटम दिला होता.
दरम्यान, पाकिस्तानी कलाकारांविरोधातील वातावरण तापले असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण केली. पाकिस्तानी कलाकारांना धमकावून पळवून लावण्यापेक्षा दहशतवाद्यांना पळवून लावायला हवे, असे वक्तव्य करीत आठवलेंनी पाकिस्तानी कलाकारांना पळवून लावण्याची मनसेची भूमिका अयोग्य असल्याचे सूचित केले होते.