मुलगी व्हर्जिन आहे की नाही याच्याशी मॉडर्न मुलांना काही देणं घेणं नसतं. पण, समाजच या गोष्टीचा जास्त विचार करतो, असं मत ‘द व्हर्जिन’ या लघुपटाने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री पिया बाजपेयी हिने व्यक्त केले. लवकरच पिया ‘मिर्झा ज्युलिएट’मध्ये बोल्ड भूमिका साकारताना दिसणार आहे.

पिया म्हणाली की, ‘आपण लग्न करत असलेली मुलगी व्हर्जिन आहे की नाही याचा सध्याची मुलं विचार करत नाहीत. त्यांच्यापेक्षा या गोष्टीची समाजालाच जास्त पर्वा असते. याच कारणामुळे अनेक मुली व्हर्जिनिटी परत मिळवण्यासाठी सर्जरी करून घेतात. मी गेल्या वर्षी केलेला ‘द व्हर्जिन’ हा लघुपट यावरच भाष्य करतो. अशी ही काही मुलं आहेत जी लग्नासाठी व्हर्जिन मुलगीच शोधतात. पण त्यांच्यापेक्षाही घरच्यांचाच यासाठी जास्त अट्टाहास असतो. आताच्या या जगात अनेकजण रिलेशनशिपमध्ये असतात. बहुतेकांमध्ये लग्नापूर्वीच शरीरसंबंधही येतात. आपल्याला भेटणारी मुलगी पहिल्याच भेटीत व्हर्जिन आहे की नाही हे अॅरेन्ज मॅरेज करणाऱ्या मुलासाठी जाणून घेणे किती महत्त्वाचे असते? यामुळे काय सिद्ध होतं? असे प्रश्न करत पियाने एक मुलगी म्हणून मी कधीच या गोष्टींचे समर्थन करणार नाही असे म्हटले.

करिअरसाठी दिल्लीतून मुंबईला स्थायिक झालेल्या पियाचा बॉलिवूड प्रवास खडतर होता. याविषयी पिया म्हणाली की, घरातून बाहेर पडल्यापासून ते व्हॉइसओव्हर आर्टिस्ट, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम आणि माझा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘लाल रंग’ मिळेपर्यंत मी बऱ्याच खस्ता खाल्ल्या. ‘मिर्झा ज्युलिएट’ चित्रपटात ती ‘मेरी कोम’ आणि ‘एन एच १०’ मध्ये झळकलेल्या अभिनेता दर्शन कुमार याच्यासोबत झळकणार आहे. राजेश राम सिंग दिग्दर्शित ‘मिर्झा ज्युलिएट’ येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होईल.