कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम बरोबरच्या संबंधांमुळे गाजलेली बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदीचे म्हणणे आहे की, ती पूर्वाश्रमीचे जीवन मागे सोडून ‘सरस्वतीचंद्र’ या संजय लीला भंन्साळींच्या पहिल्या टीव्ही मालिकेद्वारे तिच्या करिअरची नव्याने सुरूवात करीत आहे.
‘पीटीआय’शी बोलतांना ती म्हणाली,”प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडणे ठरलेले असते, जे त्यांच्यासाठी विधिलिखीत असतात. तुम्ही याबाबत काहीही करू शकत नाही, तुम्हाला अशा प्रसंगांना सामोरे जावेच लागते आणि जीवनात खंबीरपणे पुढे जात रहावे लागते. मला असे वाटते की, भूतकाळात तुमच्याबरोबर जे काही घडले, त्याला तुम्ही बदलू शकत नाही. तुम्हाला खंबीर व्हावेच लागते.”
ती म्हणाली, तिला आलेल्या अनुभवांवरून ती अधिक बुद्धिमान आणि खंबीर झाली आहे.
या ३५ वर्षीय अभिनेत्रीने बॉलिवूडमधील आपल्या अतिशय छोट्याशा कारकीर्दीत ‘जोडी नंबर १’ आणि ‘प्यार इश्क आणि मुहोब्बत’ या चित्रपटांत काम केले. या चित्रपटांमध्ये ती संजय दत्त, गोविंदा, अर्जुन रामपाल आणि अन्य कलाकारांबरोबर दिसली.
२००२ मध्ये तिला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमबरोबर पोर्तुगलमध्ये अटक करण्यात आले होती आणि २००५ मध्ये या दोघांना भारताच्या हवाली करण्यात आले. अनेक महिने कारागृहामध्ये घालवल्यावर मोनिका बेदीने रियालिटी टीव्ही शो ‘बिग बॉस’द्वारे पुनरागमन केले होते.
मोनिकाला वाटते की, ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव तिला देवाच्या कृपेमुळे मिळाला आणि तिच्या आयुष्यातील त्यावेळची ती सर्वांत चांगली गोष्ट होती. बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांचा एक हिस्सा बनून जे ती करू शकली नाही ते तिच्यासाठी ‘बिग बॉस’ने केले. आता मोनिका ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेद्वारे पुनरागमन करीत आहे.