घराघरांत गणपती पाहुणा म्हणून विराजमान झाला होता, त्यामुळे चित्रपट-नाटक वगैरेंवर काट मारून सगळे त्याच्या उत्सवात दंग होते. हा आठवडा मात्र पुन्हा एकदा चित्रपटगृहांकडे वळण्याचा असल्याने आज चांगल्या चित्रपटांचा पाऊस पडतोय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मीलन ल्युथारिया दिग्दर्शित ‘बादशाहो’, आनंद एल. राय यांची निर्मिती असलेला ‘शुभमंगल सावधान’ हे हिंदीत तर मराठीत ‘बंदूक्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

बादशाहो

‘बादशाहो’ची लांबलचक कलाकारांची यादी पाहता त्यात मनोरंजनाचा मसाला जास्त असणार हे साहजिकच मनात येते. पण चित्रपटाचे दिग्दर्शन मीलन ल्युथारिया यांचे असल्याने मनोरंजनाची मात्रा असली तरी त्यात आशयही आहे. चित्रपट आणीबाणीच्या काळातील एका कथेवर आधारित आहे. १९७५ मध्ये जयपूरच्या राणी गीतांजली यांना कुठलीही सूचना न देता सरकारकडून अटक केली जाते. त्यांच्या आलिशान महालातील सोने जप्त करून ते दिल्लीपर्यंत आणण्याचा निर्णय घेतला जातो. जयपूर ते दिल्ली या अ‍ॅक्शनपॅड प्रवासाभोवती ही रजत अरोरा लिखित ‘बादशाहो’ची कथा रचण्यात आली आहे. चित्रपटात राणीच्या भूमिकेत इलियाना डिक्रुझ आहे, तर तिच्याबरोबर अजय देवगण, इम्रान हाश्मी, ईशा गुप्ता, विद्युत जमवाल अशी नामवंत कलाकारांची मांदियाळी आहे.

शुभमंगल सावधान

छोटा शहर बडी कहानी हा सध्या हिंदी चित्रपटांचा यशस्वी फॉम्र्युला आहे. ‘तनु वेड्स मनु’, ‘रांझना’कार आनंद एल. राय यांनी दिग्दर्शक म्हणून हा जॉनर यशस्वी केला होताच. आता निर्मात्याच्या भूमिकेत शिरूनही त्यांनी हा जॉनर पुढे नेला आहे. भूमी पेडणेकर आणि आयुषमान खुराणा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नावाप्रमाणेच त्यांच्या शुभमंगलची कथा दाखवणार आहे. शुभमंगल करण्यासाठी सज्ज असलेली ही जोडी बोहल्यावर चढण्याच्या दोन दिवस आधीच नायक  आपल्याला असलेल्या विचित्र आजाराबद्दल सावधान होतो. मग उपचार की विवाह या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधीच दोघांच्याही कुटुंबांना हा पेच लक्षात येतो. आणि मग त्यावर मार्ग काढण्याऐवजी गुंतागुंत वाढत जाते. हलकीफुलकी विनोदी कथा असलेला हा चित्रपट आहे.

बंदूक्या

‘बंदूक्या’ हा नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळा, ग्रामीण भाषेचा वेगळा लेहजा घेऊन आलेला आणि चार राज्य चित्रपट पुरस्कारांचा मानकरी ठरलेला चित्रपट आहे. राहुल मनोहर चौधरी दिग्दर्शित ‘बंदूक्या’ या चित्रपटात इरसाल कथेबरोबरच  इरसाल कलाकारांची जुगलबंदी पाहायला मिळेल. अतिशा नाईक, शशांक शेंडे, नामदेव मुरकुटे, नीलेश बोरसे, अमोल बागुल, तन्मयी चव्हाण यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

बॉक्सऑफिस

* अ जंटलमन- १६.१५ कोटी

* बाबुमोशाय बंदूकबाज- ५.२ कोटी

* बरेली की बर्फी- २३.४ कोटी

* टॉयलेट एक प्रेमकथा- १२८.७ कोटी

*  अ‍ॅनाबेले क्रिएशन- ४४ कोटी