एखादा शुक्रवार असाही येतो जेव्हा ढिगाने मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. हिंदीत फारसा मोठा चित्रपट नसतो. अर्थात, या शुक्रवारी हिंदी चित्रपटांमधले मोठे खिलाडी नसले तरी रुपेरी पडद्यावर फटकेबाजी होणार आहे. क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या झुंजार खेळीचा वेध घेणारा चित्रपट त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. आणि जोडीला चार मराठी चित्रपटांची पर्वणीही असणार आहे.

करार

सुबोध भावे, ऊर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मनोज कोटियन दिग्दर्शित या चित्रपटाला अखेर प्रदर्शनाचा मुहूर्त मिळाला असल्याने गेले कित्येक दिवस येतो आहे, येतो आहे.. असे म्हणत हा चित्रपट सगळीकडच्या चित्रपटगृहात दाखल झाला आहे. आयुष्याकडे केवळ करार म्हणून पाहणाऱ्या तरुणाची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्याच्या या करारी दृष्टिकोनामुळे त्याच्या आयुष्यात येणारे ताणतणाव, पत्नीला अनादराने वागवण्याचा त्याचा स्वभाव आणि याचे परिणाम दाखवणारा हा कौटुंबिक चित्रपट आहे.

ताटवा

जात-पात, आर्थिक विषमता आजही समाजात किती मूळ धरून आहे. आणि एकमेकांना दूर करणाऱ्या या गोष्टी बाजूला सारून निर्मळ मनाने दोन जीव जेव्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा विषमतेचाच उदोउदो करणारा समाज त्यांच्यावर आपलेच नियम कसे लादत राहतो, याचे चित्रण करणारा हा चित्रपट ज्येष्ठ अभिनेता अरुण नलावडे यांनी दिग्दर्शित केला आहे. संजय शेजवळ आणि गौरी कोंगे हे दोन नवोदित कलाकार या चित्रपटात नायक-नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सचिन : अ बिलियन ड्रीम्स

‘सचिन तेंडुलकर’ या नावामागचा संघर्ष, त्याची झुंजार खेळी, त्याची जडणघडण अशा सगळ्या गोष्टी एकामागोमाग एक पाहायला मिळणार असतील, तर यापेक्षा मोठा आनंद त्याच्या चाहत्यांसाठी नाही. त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे इथे या भूमिकेच्या निमित्ताने सचिन आपलेच आयुष्य पुन्हा जगला आहे. म्हणजे सचिन तेंडुलकरची भूमिका अन्य कुठल्याही कलाकाराने केली नसून तो स्वत:च आपली भूमिका जगताना पडद्यावर दिसणार आहे. जेम्स अर्सकाइन लिखित, दिग्दर्शित हा चित्रपट कसा असेल? याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांना चित्रपटगृहात नक्की घेऊन येईल.

खोपा

डॉ. सुधीर निकम दिग्दर्शित ‘खोपा’ हा चित्रपट एका लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आला आहे. या लहान मुलाच्या नजरेतून त्याच्या अवतीभोवती असलेल्या माणसांची, त्यांच्या दुरावत जाणाऱ्या नातेसंबंधांची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असून त्यांच्याबरोबर संकर्षण कऱ्हाडे, ऐश्वर्या तुपे, यतीन कार्येकर, भारत गणेशपुरे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.

ओली की सुकी

सवरेत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट म्हणून राज्य चित्रपट पुरस्कार मिळवणारा आनंद दिलीप गोखले दिग्दर्शित ‘ओली की सुकी’ हा चित्रपटही राज्यभरात प्रदर्शित झाला आहे. परिस्थिती आणि योग्य मार्गदर्शनाअभावी वाया गेलेल्या मुलांची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्याप्रति असलेला समाजाचा दृष्टिकोन बदलणे महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटात तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहोकरे, सुहास शिरसाट यांच्याबरोबर बारा बालकलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बॉक्स ऑफिस

* बाहुबली २ (हिंदी) – ४६०.२५ कोटी  * हाफ गर्लफ्रेंड – ४३.७५ कोटी

* हिंदी मीडियम – १९.७५ कोटी  * सरकार ३ – ९.२५ कोटी  * मेरी प्यारी बिंदू – ९.२५ कोटी