सोनाली कुलकर्णी यांचे प्रतिपादन

‘‘कोणता कलाकार आजारी पडला, कुणाचे कुणाशी जुळले हे प्रसिद्धीचे पेव आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, हे दुर्दैवी वाटते. चित्रपटाचे यशापयश आणि कलाकाराचे वैयक्तिक आयुष्य याच्या पलीकडे त्याच्या जगण्यात काय अंश येऊन गेले असतील हे कळून घ्यायला हवे. एखाद्या कलाकाराला गोष्ट कशी सुचली असा शोध आपल्या आजूबाजूच्या अनेक सृजनशील व्यक्तींच्या बाबतीत घेता येईल. परंतु तो घेतला जात नाही. तरीही मराठीत काही प्रमाणात तसा प्रयत्न होतो,’’ असे मत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ऑड्री हेपबर्न यांचा अभिनय, त्यांचे सौंदर्य व त्यांची सामाजिक जाणीव या विषयी विनिता महाजनी यांनी लिहिलेल्या ‘मृगनयनी मनस्विनी : ऑड्री हेपबर्न’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार, पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे या वेळी उपस्थित होते.

माणसाच्या अलौकिक दिसण्याच्या पलीकडे त्याच्या जगण्यात काय अंश येऊन गेले असतील हे कळून घ्यायला हवे, असे सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले. प्रसिद्धीच्या झोतात असताना काही वेळा कलाकार आपल्याला भूमिका साकारायची आहे हे विसरतात, असे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘कलाकारांचे आवडते दिग्दर्शक, आवडते रंगभूषाकार अशा गोष्टी ठरून जातात आणि तो अभिनेता वा अभिनेत्री सर्व चित्रपटांमध्ये सारखेच कसे दिसतात, असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.

चित्रपट पाहताना त्यातील व्यक्तिरेखाच वाटतील अशी माणसे कमी असतात.’’

प्रकाशनानंतर ऑड्री हेपबर्न यांची भूमिका असलेला ‘रोमन हॉलिडे’ हा चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटाचे व आपल्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे नाते असल्याची भावना फिरोदिया यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांनी प्रथम ऑटो रिक्षा बनवल्या परंतु त्या काळातील टांग्यांसमोर रिक्षा टिकाव धरू शकल्या नाहीत. नंतर त्यांनी स्कूटर बनवली, पण त्याबद्दलही लोकांना शंका असत. तेव्हा त्यांनी ‘रोमन हॉलिडे’ हा चित्रपट येथे पुनप्र्रदर्शित केला. कुणी स्कूटरविषयी शंका काढली, की ऑड्री हेपबर्न देखील स्कूटर चालवते असे उदाहरण ते देत.’’