बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची महत्तावाची भूमिका असणाऱ्या ‘दंगल’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. आमिरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुनही हा ट्रेलर शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. महत्त्वाकांक्षी वडिलांची त्यांच्या मुलींना प्रोत्साहन देण्याची सत्य कथा या चित्रपटात साकारण्यात आली आहे. त्याचीच काही झलक या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
कुस्तीच्या सामन्याच्या जल्लोषामध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. ‘मेडलिस्ट पेडपे नही उगते, उन्हे बनाना पडता है’, असा अमिरचा हरयाणवी बाजातील डायलॉग ट्रेलरच्या सुरूवातीलाच अनेकांची मने जिंकत आहे. महावीर सिंग फोगट यांच्या कुस्तीच्या प्रवासाची आणि देशासाठी सुवर्ण पदक मिळवण्याच्या त्यांच्या स्वप्नाचा पाठपुरावा करणारा हा ट्रेलर अनेकांच्या पसंतीस पडत आहे. सुवर्ण पदक मिळवण्याचे स्वप्न आपला मुलगाच पूर्ण करणार अशी आस लावून राहिलेल्या महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीच्या पदरी चारही मुलींचाच जन्म होतो. पण त्यांच्या गीता आणि बबिता या दोन्ही मुली काही मुलांपेक्षा कमी नाहीत याची जाणीव महावीर सिंग फोगट यांना झाल्यानंतर या दोन्ही मुलींना कुस्तीसारख्या मर्दानी खेळामध्ये उतरवत त्यांना या खेळासाठी तयार करण्यासाठी महावीर सिंग फोगट यांनी घेतलेली मेहेनत या साऱ्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. कुस्तीच्या आखाड्याध्ये पुरुषांशी दोन हात करत त्यांना चितपट करणाऱ्या गीता-बबिताची झलकही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. दलेर मेहेंदी यांनी गायलेले प्रोत्साहनपर गाणे या ट्रेलरमध्ये ‘चार चांद’ लावत आहे असे म्हणायला हरकत नाही.
नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रसिकांना आमिर खान विविध रुपांमध्ये दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने घेतलेली मेहनत सर्वांच्याच नजरेस पडत आहे. आमिरसोबतच अभिनेत्री साक्षी तन्वर या चित्रपटामध्ये महावीर सिंग फोगट यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तर, फातिमा सना शेख ही ‘गीता फोगट’च्या आणि सनाया मल्होत्रा ‘बबिता कुमारी’च्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘म्हारी छोरिया छोरोसे कम है के?’, असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे २३ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.