स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे हे अभिनयातले दोन हुकमी एक्के घेऊन काढलेला ‘मुंबई-पुणे-मुंबई’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ हो दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडले, यशस्वी ठरले. २०१० मध्ये ‘मुंबई-पुणे-मुंबई’ आणि त्यानंतर २०१५ मध्ये ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ प्रदर्शित झाला. स्वप्नील आणि मुक्ताची प्रेमकथा पडद्यावर यशस्वी ठरल्यानंतर आता त्याचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’चा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मुक्ता बर्वेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे.

‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा मूळ चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यावेळी पुण्याचा मुलगा आणि मुंबईची मुलगी यांची प्रेमकथा सुरू झाली होती. त्या दोघांचं पुढे काय झालं, हे पाहायला आम्हाला आवडेल, अशा प्रतिक्रिया कितीतरी प्रेक्षकांनी दिल्या होत्या. त्यानंतर त्यांची लग्नकथा पडद्यावर रंगताना दोन्हीकडच्या कुटुंबांची वऱ्हाडी मंडळी म्हणजे कसलेल्या कलाकारांचा ताफा घेऊन केलेल्या ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ या सिक्वलपटाला तिकीटबारीवर चांगलं यश मिळालं. तेव्हाच दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया यांनी तिसऱ्या भागाचीही घोषणा केली होती.

वाचा : अक्षयच्या गाण्यावर नाचताना राजकुमारच्या पायाला दुखापत  

आता या तिसऱ्या कथेत काय पाहायला मिळणार, दुसरा भाग जसा लोकांना आवडला तसाच तिसराही आवडेल का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. २७ एप्रिल २०१८ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.