अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचे मत, घरगुती वातावरणात रंगली मुलाखत

कलाकृतीपेक्षा कलावंत मोठा नसतो, तो भूमिकेला शरण जातो, असे सांगून कलाकृतीपेक्षा मोठे होण्याचा अट्टाहास नसावा, असे मत अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. चित्रपट क्षेत्रात खूप पैसा आहे, असे लोकांना वाटते. मात्र, तसे नाही. येथे झगमगाट भरपूर आहे. अधिक पैसे कमवण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्यांनी भरपूर कष्टाची तयारी ठेवली पाहिजे, असेही ती म्हणाली.

गांधीपेठ तालीम मंडळाच्या रौप्यमहोत्सवी व्याख्यानमालेत मुक्ताची सुधीर गाडगीळ यांनी प्रकट मुलाखत घेतली. दोन तास रंगलेल्या या मुलाखतीत चिंचवडच्या लहानपणाच्या विविध आठवणी ते नायिका, निर्माती तसेच मालिका, चित्रपट आणि नाटकांचा प्रवास तिने मनमोकळेपणाने उलगडून सांगितला. मुक्ताची आई आणि येथील विद्यार्थिप्रिय शिक्षिका विजयाबाई बर्वे, वडील वसंत बर्वे यांच्यासह मुक्ताचे नातेवाईक, मित्रमंडळींसह मोठय़ा संख्येने नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आतापर्यंतच्या प्रवासात सहकार्य करणारे मित्र, मार्गदर्शक, कलावंत, निर्माते, सहकलाकार आदींविषयी तिने कृतज्ञता व्यक्त केली. मुक्ता म्हणाली,‘‘ दहावीच्या सुटीत नाटकात काम केले. बारावीनंतर तीन वर्षे नाटय़शास्त्राचा अभ्यास केला. पुढे छंद चित्रपट व नाटय़क्षेत्रातच करिअर बनले. हे क्षेत्र परावलंबी आहे. कधीही सक्तीची सुटी घेण्याची वेळ येऊ शकते. दोन कामांमधील विश्रांतीचा काळ ‘हेल्दी’ असणे गरजेचे आहे. तमाशा आवडीने पाहते, एकांकिकांना अजूनही हजेरी लावते. याच क्षेत्रातील मित्र मंडळी असल्याने विचारांची देवाण-घेवाण होते. ‘जोगवा’साठी गडिहग्लज येथे चित्रीकरण करताना जोगतिणींचे आयुष्य जवळून पाहिले, तेव्हा अस्वस्थ झाले होते. अशा उपेक्षित वर्गासाठी काहीतरी करावे, असे वाटले होते. मात्र, ज्या क्षेत्रात आहे, तेथे राहूनही चांगले काम करता येईल, या आईच्या सल्ल्याने करिअरकडे लक्ष केंद्रित केले.

‘लोकसत्ता’साठी केलेले लेखन वाचकांना आवडत होते, लिखाणाचा तो काळ एक सुखद अनुभव होता. मोकळेपणाने अनुभव सांगणारी सध्याची पिढी आहे. हिंदूी चित्रपटांकडून विचारणा झाली, मात्र छोटय़ा भूमिका असल्याने तिकडे वळले नाही. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आहेत. ‘सैराट’च्या अर्चीने खूपच चांगले काम केले आहे. तिने स्वत:चे शिक्षण पूर्ण करावे, असे ती म्हणाली. अभिजित कोकणे यांनी सूत्रसंचालन केले.