‘मुरांबा’ हा दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांचा पहिलाच चित्रपट आहे. आणि पहिल्याच चित्रपटात आई-वडील आणि मुलगा-मुलगी अशा सरळ वळणाच्या कौटुंबिक कथेला तिरपा छेद देणारी कथा त्याने रंगवली आहे. तेही सचिन खेडेकर, चिन्मयी सुमित, अमेय वाघ आणि मिथिला पालकर अशा आजवर न पाहिलेल्या जोडय़ा घेऊन..

आई-वडील, मुलगा-मुलगी ही नाती कायम असतात. पण या घट्ट नात्यांचा गोडवा जाणवण्यासाठी ती नाती समजून-उमजून फुलवावी लागतात. या चित्रपटात दोन मित्र-मैत्रिणी, त्यांच्यात प्रेमाची भावना जागल्यानंतर झालेला बदल आणि एकत्र आल्यानंतरचा दुरावा.. नात्यातील या बदलाला सामोरे जाताना आपल्या मुलाला सावरण्यासाठी सरसावणारे आई-वडील अशी वेगळी चौकट यात दिसते. मात्र वरुणच्या मते सध्याच्या मत्रीपूर्ण  कुटुंब व्यवस्थेचा हा एक प्रकारे आरसाच आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन अशा दोन्ही जबाबदाऱ्या वरुणने पेलल्या आहेत. या कथेबद्दल विस्तृतपणे बोलताना, ‘सामाजिक माध्यमांत आपण गुंतत चाललो असल्याने आपल्याला पटकन प्रतिक्रिया देण्याची आणि व्यक्त होण्याची सवय लागली आहे. मात्र या सवयीने आपल्या रोजच्या आयुष्यात शिरकाव केला असून नात्यांमध्येही डोकावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे’, असे निरीक्षण वरुणने नोंदवले. नाते कुठलेही असो ते जपताना कोणतीही अपेक्षा न बाळगता त्याला मुरायला थोडा वेळ दिला पाहिजे, तरच ते नाते घट्ट मुरते.. त्याचा उत्तम मुरांबा तयार होतो, हा या चित्रपटामागचा विचार असल्याचे वरुणने सांगितले. प्रत्येक पिढीसमोर काही ना काही आव्हाने असतात. ही आव्हाने ती पिढी कशा पद्धतीने पेलते आणि आपले कुटुंब कसे सावरते यावर ‘मुरांबा’ भाष्य करतो, असे वरुण म्हणाला.

या चित्रपटातील दोन्ही जोडय़ांच्या निवडीची प्रक्रियाही त्याने समजावून सांगितली. हा चित्रपट सद्य कुटुंबव्यवस्थेवर आधारलेला असल्याने त्यामधील आईने ‘आई’ होण्याचा अभिनय करावा असे अपेक्षित नव्हते. त्या वयाच्या मुलाच्या आईची घालमेल समजू शकेल अशीच व्यक्ती त्या भूमिकेसाठी हवी होती. शिवाय, आई म्हणून जे चेहरे सतत समोर येतात तेही नको होते. या सगळ्याचा विचार

पान १ वरून करता निवडक पण चांगल्या भूमिकाच करणारी अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची निवड अगदी सहज आणि योग्य होती, असे त्याने सांगितले. तर सचिन खेडेकर यांच्यासारख्या कलाकाराबरोबर काम करणे हे प्रत्येक दिग्दर्शकाचे स्वप्न असते. ते आज या चित्रपटामुळे पूर्ण झाले हे सांगतानाच त्यांच्याबरोबर काम करत असताना दिग्दर्शकाच्या चौकटीमधून बाहेर पडून प्रत्येक प्रसंग त्यांचा प्रेक्षक म्हणूनही पाहत होतो, अशी चित्रीकरणादरम्यानची आठवणही त्याने गप्पांमध्ये सांगितली.  अमेय वाघ हा गेली अनेक वर्षे मित्र असल्याने तो दिग्दर्शक म्हणूनही आपल्याला समजून घेईल, या विचाराने त्याची निवड केल्याचे वरुणने सांगितले. तर त्याच्या जोडीला मिथिलाची निवड करताना नव्या चेहऱ्याच्या शोधात आपण होतो, असे त्याने स्पष्ट केले. मिथिला पालकर हे सामाजिक माध्यमात प्रसिद्ध असलेले नाव आहे. मात्र या चित्रपटासाठी तिची निवड करण्यापूर्वी तिच्या समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीचे वलय बाजूला ठेवून रीतसर ऑडिशन घेऊनच तिच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब के ल्याचेही वरुणने सांगितले.

चित्रपटात आई-वडिलांची भूमिका म्हणून पहिल्यांदाच एकत्र काम करणारे चिन्मयी सुमित आणि सचिन खेडेकर यांच्यासोबत रंगलेल्या गप्पांमध्ये दोघांनीही आपण वास्तवात आई-वडील म्हणून कसे आहोत, याबद्दल काहीही हातचे न राखता सांगितले.

एक चित्रपट, पाच निर्माते

या एका चित्रपटासाठी पाच निर्माते एकत्र आले आहेत. मात्र सध्याचा एकूणच चित्रपटांचा प्रवाह लक्षात घेता निमार्त्यांनी आर्थिक गणिताचा विचार न करता त्याच्या सर्जनशीलतेवरही लक्ष देणे गरजेचे झाल्याचे मत निर्माते अनिष यांनी व्यक्त केले. त्यामुळे ‘मुरांबा’सारख्या चांगल्या चित्रपटासाठी आम्ही पाच जण एकत्र आलो, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर महेश मांजरेकरांचा ‘एफ यू’ आणि आमचा ‘मुरांबा’ हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असले तरी त्यात वावगे काही नाही. उलट मराठी रसिकांना दोन चांगल्या कलाकृती पाहायला मिळणार असल्याने स्पर्धेचा प्रश्नच येत नसल्याचे निर्माते नितीन वैद्य यांनी सांगितले.

‘स्वत:ला सिद्ध करण्याची योग्य संधी’

युटय़ूबवर आधीपासूनच कार्यरत आहे, प्रसिद्धीही मिळाली आहे. पण मला कायम अभिनेत्रीच बनायचे होते. याआधी प्रयत्न करून पाहिला होता पण संधी मिळाली नाही. त्यामुळे ‘मुरांबा’ची ‘इंदू’ मिळाली तेव्हा ती अक्षरश: खेचून घेतली. पहिलाच चित्रपट असल्याने दडपण आले होते. पण या तिघांनीही ते उत्तम कलाकार असूनही मला सांभाळून घेतले. वरुणचा खास उल्लेख करेन. त्याने मला माझ्या भाषेत चित्रपट समजावून दिला आणि काम करणे सोपे झाले. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ‘मुरांबा’सारखी दुसरी योग्य संधी मला मिळाली नसती.

मिथिला पालकर

‘आठवणींना ढवळून काढणारा अनुभव’

माझ्यासाठी या चित्रपटाचा अनुभव म्हणजे स्वत:च्या आठवणींना ढवळून काढण्यासारखे होते. माझाही प्रेमभंग झाला आहे. शिवाय, चित्रपटात जसे आई-वडील आणि मुलाचे नाते आहे. प्रत्यक्षात माझ्या घरी माझे आई-वडिलांशी तसेच नाते आहे. दिवसभरात जे जे काही घडले ते मी थेट घरी जाऊन आईला सांगतो. त्यामुळे मला कधी डायरीही लिहिण्याची गरज भासलेली नाही. या चित्रपटातील दृश्यन् दृश्य करताना माझ्या घरात आई-वडील कसे वागले होते, मी काय केले होते याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहायचे. मी घरी आईला सांगायचो, आपण जसे केले होते ना तसेच इथेही लिहिले आहे. आम्ही आज तेच चित्रीकरण केले. त्यामुळे या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग म्हणजे माझ्याच स्मृतींचे उत्खनन आहे. गेली पंधरा वर्षे मी अभिनय क्षेत्रात आहे. याआधीही मी चित्रपट केलेत तरी लोकांना हा माझा पहिलाच चित्रपट वाटतो, याचे वाईट वाटते. पण ते चित्रपटही खूप काही शिकवून गेले. आता जी लोकप्रियता मिळाली आहे ती अर्थातच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे आहे. पण अभिनेता म्हणून ‘मुरांबा’कडून मला खूप अपेक्षा आहेत.

अमेय वाघ 

‘मी कधीच मुलांच्या मध्ये-मध्ये नव्हते’

माझ्या कामाचे स्वरूप मी नेहमी असेच ठेवले की मी कायम माझ्या मुलांच्या आसपास असेन. त्यांना कधीही-काही लागले तर मी त्यांना सहज उपलब्ध असेन, असा विचार करूनच काम करत होते. पण  त्याच्या आयुष्यात मध्ये-मध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न मी कधीच केला नाही. आपले हे असे असणे किती उपयोगी पडेल हे कळायचे नाही. पण जेव्हा मुलाच्या आयुष्यात प्रेमभंगाचा असा प्रकार झाला तेव्हा त्याला पहिल्यांदा आपल्याशी बोलावेसे वाटले हे पाहिल्यानंतर आपण जे केले ते योग्य होते याची प्रचीती आली.ं

 चिन्मयी सुमित

नटाने खासगी आयुष्य जपले पाहिजे

आपल्या मुलाशी मित्रासारखे वागणे हा विचार सहजसोपा वाटला तरी तो तसा नसतो. त्याच्याबरोबर मित्र म्हणून वागण्यासाठी वडिलांना प्रयत्नच करावे लागतात. आपण सगळे आपल्या जगण्यामध्ये काही गोष्टी ठरवून त्याप्रमाणे वागतो. मित्रत्वाच्या नात्याने वागण्याचा विचारही जाणीवपूर्वक करावा लागतो. माझा मुलगा माझा चांगला मित्र आहे, मी नेहमीच त्याच्याशी तसे वागतो वगैरे सांगणारे खोटे आहेत. या चित्रपटात वडील आपल्या मुलाशी मित्रत्वाचे ते नाते जपण्याचा प्रयत्न करतात हे दाखवले आहे. साधारण अशा चित्रपटांची स्थिती ही एका बाजूला कललेली असते. मात्र ‘मुरांबा’ हा चार खांबांवरती (चारही कलाकारांवरती) भक्कमपणे उभा राहिला आहे. अशा प्रकारच्या भूमिका कलाकाराकडे याव्या लागतात तरच तसे काम करणे शक्य होते. मलाही माझ्या कामात आलेला तोच-तोच पणा जाणवत होता. नवीन काही तरी करायचे होते जे ‘मुरांबा’मुळे शक्य झाले. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने आणि अमेय-मिथिला यांच्यासारख्या समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या तरुण कलाकारांमुळे खरेच या माध्यमात आपण दिसलो नाही तर मागे पडू की काय अशी भीती कलाकार म्हणून वाटू लागली आहे. पण अजूनही मी तितकासा समाजमाध्यमांवर सक्रिय नाही. कारण नटाने आपले खासगी आयुष्य जपले तरच पडद्यावर तो प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतो, लोकांच्या मनातील त्याच्याबद्दलची उत्सुकता कायम राहू शकते, या जुन्या मताचा मी आहे.

– सचिन खेडेकर

छाया सौजन्य : गणेश तेंडुलकर

संकलन : अक्षय मांडवकर