मुंबई दूरदर्शन केंद्रावरील ‘शब्दांच्या पलीकडले’, ‘गजरा’, ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ असो किंवा अन्य कोणताही विशेष सांगीतिक कार्यक्रम असो. त्या कार्यक्रमात एक व्यक्ती हमखास असायची. दूरदर्शनच्या प्रेक्षकांनाही ‘पांढरे केसवाला’ तो चेहरा ओळखीचा झाला होता. या व्यक्तीने पुढे ‘संगीत संयोजक’ म्हणून आपले स्वतंत्र स्थान आणि ओळख निर्माण केली. सहा हजारांहून अधिक रंगमंचीय कार्यक्रम आणि साडेचारशे ध्वनिफितींचे यशस्वी ‘संगीत संयोजक’ असा त्यांचा सांगीतिक प्रवास आहे. ज्यांच्या सांगीतिक कारकिर्दीचेही सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे ते ज्येष्ठ संगीत संयोजक उज्ज्वल ऊर्फ आप्पा वढावकर आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.

दूरदर्शनवरील त्या सोनेरी आठवणींना उजाळा देताना आप्पा म्हणाले, १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले तेव्हापासून आजतागायत दूरदर्शनशी जोडलो गेलो आहे. आधी संगीत संयोजक आणि आता संगीत पर्यवेक्षक व सल्लागार म्हणून काम सुरू आहे. दूरदर्शनवर गेली अनेक वर्षे ‘कंत्राटी’ पद्धतीवरच काम केले. दूरदर्शनच्या संगीतविषयक प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग असायचा. सुहासिनी मुळगावकर, अरुण काकतकर, विजया जोगळेकर-धुमाळे, किरण चित्रे, विनय आपटे, माधवी कुलकर्णी, श्रीकला हट्टंगडी आदी मंडळींबरोबर काम केले. दूरदर्शनवरील तो अनुभव खूप समृद्ध करणारा आणि शिकविणारा होता. अनेकदा ‘थेट प्रक्षेपणा’त (लाइव्ह) काम केल्यामुळे आत्मविश्वासही मिळाला. दूरदर्शनवर असतानाच शाहीर साबळे व सहकारी यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा कार्यक्रम दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात सादर झाला होता. त्याचे संगीत संयोजन करण्याची संधीही मला मिळाली. दूरदर्शनवर काम करताना अनेक मान्यवर गायक-गायिकांबरोबर काम करता आलेच पण आत्ताच्या प्रथितयश असलेल्या सुरेश वाडकर, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, देवकी पंडित या तेव्हाच्या नवोदित/उदयोन्मुख असलेल्या मंडळींबरोबरही काम केले. दूरदर्शनमध्ये आजही मला मान व आदर आहे पण इतकी वर्षे दूरदर्शनवर काम करूनही दूरदर्शनच्या एखाद्या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार का झाला नाही? याची मनात कुठेतरी खंतही आहे, असे ते म्हणतात.

Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
‘आयसर’च्या प्रवेष परीक्षेची तारीख जाहीर; अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू
Bharti Hexacom initial share sale from 3rd April
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?

आप्पा वढावकर यांना सांगीतिक कलेचा वारसा वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील राम वढावकर हे उत्कृष्ट संवादिनीवादक होते. ‘प्रभात फिल्म’ कंपनीत ते नोकरीला होते. केशवराव भोळे, मा. कृष्णराव यांच्याकडे त्यांनी काम केले. पुढे संगीतकार वसंत देसाई यांच्या वाद्यवृंदात ते संवादिनीवादक होते. दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘आल्हाद चित्र’च्या ‘चिमणी पाखरं’, ‘अबोली’, ‘धर्मात्मा’साठी संगीतकार वसंत पवार यांच्याबरोबर त्यांचाही सहभाग होता. संगीताची आवड पाहून आप्पांच्या वडिलांनी त्यांना संगीतकार प्रभाकर पंडित यांच्याकडे व्हायोलीन शिकायला पाठविले. पंडित यांच्याकडे सुमारे आठ वर्षे ते व्हायोलीन शिकले. कवीवर्य वसंत बापट यांनी राष्ट्र सेवा दलासाठी बसविलेल्या ‘गल्ली ते दिल्ली’ या लोकनाटय़ापासून त्यांची व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली. या लोकनाटय़ात त्यांनी संवादिनी वादक म्हणून काम केले. तेव्हा ते रुईया महाविद्यालयात शिकत होते. या लोकनाटय़ात स्वत: बापट सर, सुधा वर्दे, राम नगरकर अशी कलाकार मंडळी होती. १९७२ मध्ये ‘बी.ए.’ झाल्यानंतर संगीतकार वसंत देसाई यांच्याकडे संवादिनीवादक म्हणून काम केले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘एक सूर एक ताल’ उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी देसाई यांच्याकडे होती. त्यामुळे या कार्यक्रमासाठी ‘चांद्यापासून ते बांद्यापर्यंत’ विविध भागांत संगीत शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधीही आप्पांना मिळाली. पुढे देसाई यांच्यानंतर संगीतकार सी. रामचंद्र यांच्याकडे ‘एक सूर एक ताल’ची जबाबदारी आली तेव्हा त्यांच्यासमवेतही त्यांनी काम केले.

सुरुवातीची काही वर्षे वादक म्हणून काम केल्यानंतर आपल्या पुढील सांगीतिक प्रवासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, सुरुवातीला जयवंत कुलकर्णी, प्रमिला दातार यांच्यासारख्या गायकांबरोबर काम केले होते. आत्ताच्या तरुण पिढीच्या गायकांबरोबरही संगीत संयोजक म्हणून काम करतो आहे. गीतकार व कवी शांताराम नांदगावकर यांनी संगीत संयोजक म्हणून काम करण्याची संधी दिली. मी आणि माझा मित्र सुराज साठे आम्ही दोघांनी ती जबाबदारी पार पाडली. पुढे दोघांचीही कामे वाढल्यानंतर आम्ही सामोपचाराने स्वतंत्रपणे काम करण्याचे ठरविले. त्यानंतरच्या काळात विठ्ठल शिंदे, पं. यशवंत देव, स्नेहल भाटकर, राम फाटक, गजाजन वाटवे, आनंद मोडक, सुधीर मोघे, कुलदीप सिंह, अच्युत ठाकूर, मिलिंद इंगळे आणि अनेकांसाठी तसेच ‘ओंकार स्वरूपा’, ‘फिटे अंधाराचे जाळे’, ‘ऋतू हिरवा’, ‘बहिणाबाई’ या गाजलेल्या ध्वनिफितींसाठी संगीत संयोजक म्हणून मी काम केले.

संगीतकार आणि संगीत संयोजक यांच्या कामातील नेमका फरक सांगताना ते म्हणाले, ‘‘कवी-गीतकाराकडून संगीतकाराला गाणे मिळाले की त्याला चाल लावण्याची जबाबदारी ही संगीतकाराची असते. पण त्या चालीला व शब्दांना अनुसरून ‘सजावट’ करण्याचे काम संगीत संयोजकाचे असते. गाण्यात कोणती, किती आणि कशी वाद्ये वापरायची हे संगीत संयोजक या नात्याने आमचे काम असते. ते गाणे चित्रपटातील आहे, भावगीत आहे की ध्वनिफितीसाठी करायचे आहे तेही पाहावे लागते. त्या त्यानुसार संगीत संयोजन केले जाते. त्यामुळे एखाद्या गाण्यात गीतकार, संगीतकार आणि गायक यांचे जेवढे महत्त्व आहे तितकेच महत्त्वाचे योगदान संगीत संयोजकाचे असते.

अनेक मोठय़ा वाद्यवृंदासाठी संगीत संयोजक म्हणूनही काम केले. वृत्तपत्रात कार्यक्रमाच्या जाहिरातीत गायक व गायिकांची नावे असायची. पण संगीत संयोजकाचे नाव नसायचे. मला ते खटकत होते. आपल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळालेच पाहिजे, असे मला वाटले. वाद्यवृंदातून एखादा गायक-गायिका पाच ते दहा गाणी गातो. पण संगीत संयोजक या नात्याने आम्हाला कार्यक्रमातील सर्व गाणी बसवायची असतात. आमची मेहनत अधिक असते. त्यामुळे जाहिरातीच्या श्रेयनामावलीत संगीत संयोजकाचे नाव दिले जावे, अशी मागणी मी केली. त्यासाठी सर्वाशी बोललो. पाठपुरावा केला. त्यामुळे जाहिरातीच्या श्रेयनामावलीत माझे नाव द्यायला सुरुवात झालीच पण त्याचा फायदा पुढे अन्य संगीत संयोजकांनाही झाला. आता सर्व जाहिरातींत संगीत संयोजकाचेही नाव दिले जाते. स्वत:चा मोठेपणा म्हणून हे सांगत नाही पण संगीत संयोजकाला जाहिरातीच्या श्रेयनामावलीत स्थान मिळवून देण्याचे काम आपल्यामुळे झाले असल्याचा दावाही आप्पांनी केला.

पूर्वीच्या आणि आत्ताच्या कामातील झालेल्या बदलाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, तेव्हा कोणत्याही अत्याधुनिक सुविधा, उपकरणे नव्हती. एखाद्या गाण्याचे ध्वनिमुद्रण असेल तर संगीतकार, गायक, संगीत संयोजक, वादक असे सगळे एकत्र येऊन काम करायचे. सुरुवात ते शेवट असे एका दमात ध्वनिमुद्रण केले जायचे. कोणी चुकला तर पुन्हा सगळे पहिल्यापासून करावे लागायचे. आता आधुनिक तंत्रज्ञानानुसार सगळे ‘डिजिटल’ झाले आहे. प्रत्येक जण आपापल्या वेळेने आणि सोयीने येतो. आपापले गाऊन किंवा    वाजवून जातो. काही चूक झाली तर तेवढीच  दुरुस्त करता येते. काळानुसार हा बदल अपरिहार्य आहे.

वडील राम वढावकर, प्रभाकर पंडित, वसंत देसाई, पं. यशवंत देव हे आप्पांचे संगीत क्षेत्रातील गुरू. त्यांच्याबरोबरच संगीतकार व गायक सुधीर फडके यांचे संगीत संयोजक शामराव कांबळे, संगीतकार अनिल मोहिले आदींकडूनही प्रेरणा मिळालीअसल्याचे ते सांगतात. प्रभाकर पंडित व केदार पंडित, शाहीर साबळे व देवदत्त साबळे आणि सुधीर फडके व श्रीधर फडके अशा तीन पिता-पुत्रांच्या जोडय़ांबरोबर त्यांनी काम केले आहे. १९९० मध्ये एकाच दिवशी चार वेगवेगळ्या कार्यक्रमांत त्यांनी काम केले. दामोदर नाटय़गृह, रवींद्र नाटय़ मंदिर, शिवाजी मंदिर व सिटीलाइट येथे झालेल्या ‘सप्तरंग’, ‘मंगलगाणी दंगलगाणी’, ‘शुक्रतारा’, ‘हिंदूोळे स्वरांचे’ या कार्यक्रमांचा संगीत संयोजक म्हणून त्यांचा सहभाग होता. २७ सप्टेंबर २००९ मध्ये रवींद्र नाटय़ मंदिर येथे प्रा. विसुभाऊ बापट यांच्या ‘कुटंब रंगलंय काव्यात’ कार्यक्रमाचे सलग पाच प्रयोग झाले. त्याचेही संगीत संयोजन आप्पांचेच होते. जागतिक मराठी परिषदेच्या ‘स्मरण यात्रा’ या गाजलेल्या कार्यक्रमाचे संगीत संयोजन करण्याची संधीही त्यांना मिळाली. अलीकडेच त्यांनी अमेरिकेतील एका संस्थेसाठी गुजराथी बॅलेकरिता १५ गाण्यांचे संगीत संयोजन केले आहे.

‘संस्कार भारती’, ‘कलासाधना’, मराठी  व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ, ‘सोहम प्रतिष्ठान’ व ‘स्वरगंधार’, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू दादर व रायगड समाज यांच्याकडून विविध सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. केशराव भोळे पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केले गेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन, ‘नाटय़ दर्पण’, ‘चतुरंग प्रतिष्ठान’, नेहरू सेंटर, ‘इंद्रधनू’, ‘हृदयेश आर्ट्स’ आदी संस्थांच्या अनेक कार्यक्रमांसाठीही त्यांनी संगीत संयोजकाची भूमिका पार पाडली आहे.

जाहिरातींची जिंगल्स, मराठी मालिका, नाटक, चित्रपट, ध्वनिफिती, सांगीतिक कार्यक्रम आदींसाठीच्या संगीत संयोजनाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. वयाच्या ६७ व्या वर्षांत असलेल्या आप्पांनी आता फारशी दगदग नको म्हणून काम थोडे कमी केले आहे.  ‘स्वरबंध चॅरिटेबल ट्रस्ट’ या आपल्या संस्थेसाठी त्यांचे काम सुरू असते. संस्थेतर्फे दरवर्षी कोणत्या तरी एका संस्थेस वैद्यकीय मदतीसाठी आर्थिक निधी देण्यात येतो.  सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संस्थेतर्फे दरवर्षी रंगमंच व ध्वनिमुद्रण क्षेत्रात २५ वर्षांहून अधिक काळ ज्यांनी काम केले आहे, अशा वादकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

संगीत संयोजनाच्या क्षेत्रात ज्यांना यायचे आहे अशा तरुण पिढीने सर्वप्रथम आधुनिक तंत्रज्ञान शिकून घेतले पाहिजे. जी वाद्ये आपण गाण्यात वापरणार आहोत त्या प्रत्येक वाद्याची किमान प्राथमिक माहिती त्यांना असावी. त्या त्या वाद्यातून संगीताचे तुकडे (म्युझिक पीस) कसे वाजवायचे त्याचे ज्ञान त्यांना असले पाहिजे. त्यांनी सतत गाणे ऐकले पाहिजे. यातून त्यांचा कान तयार होईल. खरे तर या क्षेत्रात काम करताना मिळणारा प्रत्यक्ष अनुभव हाच तुमचा खरा गुरू असतो. तो तुम्हाला खूप काही शिकवितो असे सांगत आप्पांनी या गप्पांचा समारोप केला.