कारकीर्दीमध्ये आतापर्यंत मिळालेल्या यशाचे श्रेय माझे आणि फक्त माझेच असल्याचे अभिनेत्री प्रियांका चोप्राने म्हटले आहे. मंगळवारीच प्रियांकाला राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमेरिकी टीव्ही कार्यक्रम ‘क्वांटिको’तील भूमिकेमुळे प्रियांका सध्या जगभरात ओळखला जाणारा चेहरा झाला आहे. त्याचबरोबर तिचा हॉलीवूडमधील ‘बेवॉच’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होतो आहे.
प्रियांका म्हणाली, भारत आणि अमेरिका या दोन्ही ठिकाणी काम करीत असल्यामुळे माझ्याकडे स्वतंत्र टीम आहे. ही टीम दोन्ही ठिकाणचे माझे कार्यक्रम निश्चित करत असते. त्याचबरोबर इतरही कामे करते. दोन्ही देशांमध्ये काम करीत असल्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या कोणाची गैरसोय होऊ नये, याकडे त्यांना प्राधान्याने लक्ष द्यावे लागते. माझ्याबाबतीत बोलायचे झाले तर जे काम माझ्याकडे येते ते मनापासून पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो. जीव ओतून मी ते काम करते. त्यामुळे मिळालेल्या यशाचे श्रेयही माझेच आहे. शूटिंगच्या वेळी मीच कॅमेऱ्यासमोर उभी असते. त्यामुळे त्यातून मिळालेल्या यशामध्ये आणखी कोणी वाटेकरी असण्याचे कारणच नाही, असे तिने सांगितले.
काम करणाऱ्या तरुणींकडून त्यांच्या यशाचे श्रेय काढून घेण्याची लोकांची सवय असते. हिच्या यशामागे याचा हात आहे, असे म्हणणाऱ्यांना मी एवढेच सांगेन की तसे असेल तर तिच्यासारखे अन्य कोणी का तयार होत नाही, असे प्रियांकाने म्हटले आहे.