सिनेमाच्या क्षेत्रात कालच्या पुण्याईवर आज जगता येत नाही, असं म्हणतात. सिनेमाचा पहिला भाग कितीही चांगला असला तरी दुसरा भाग चांगला असेल आणि तो हिट होईल, असेही काही नाही. पण याला अपवाद ठरेल तो ‘नाम शबाना’. परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वतःसाठी आणि देशासाठी महिला त्यांच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आजही मात करु शकतात, असा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे.

मुंबईत आपल्या आईसोबत राहणाऱ्या शबानाचा (तापसी पन्नू) भूतकाळ असतो. सगळं काही सुरळीत चालू आहे, असं वाटत असताना तिच्यासोबत अशा काही घटना घडत जातात की ती स्पेशल फोर्समध्ये सहभागी होते. ‘नाम शबाना’ हा ‘बेबी’ सिनेमाचा ‘प्रीक्वल’ आहे. ‘बेबी’मध्ये तापसीची एन्ट्री कशी झाली दाखवणारा हा सिनेमा आहे.

संपूर्ण सिनेमा उत्तमरित्या बांधण्यात आला आहे. शबानाच्या मनातली घालमेल, तिची चिडचिड आणि तिच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक दाखवण्यात आली आहे. ट्विट्स अॅण्ड टर्नमुळे हा सिनेमा शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरण्यात यशस्वी ठरतो. शिवम नायरचे दिग्दर्शनही वाखणण्याजोगे आहे. शिवमच्या दिग्दर्शनाला सिनेमॅटोग्राफरचीही तेवढीच चांगली साथ लाभली आहे हे मान्य करावं लागेल. सिनेमातले अॅक्शन सीन्सही फार जबरदस्त आहेत.

सिनेमात अक्षय कुमारची उपस्थितीच अर्ध श्रेय जिंकून घेते. अक्षयचे या सिनेमातले काम सह-कलाकार म्हणून असले तरी जेव्हा ही त्याची एन्ट्री होते तेव्हा सिनेमा वेग घेताना दिसतो. तापसी पन्नूच्या दमदार अभिनयाची दाद द्यायला हवी. सहज आणि मनाला भिडेल, असा अभिनय तिने या सिनेमात केला आहे. तर मनोज बाजपेयीने एका वरिष्ठ अधिकाऱ्याला साजेसे काम केले आहे.

नीरज पांडेच्या नावावरच ‘स्पेशल २६’ आणि ‘बेबी’ सिनेमातली ही कलाकारी मंडळी एकत्र आली असेच म्हणावे लागेल. ‘नाम शबाना’ हा ‘बेबी’चा प्रीक्वल जरी असला तरी यात ‘स्पेशल २६’ आणि ‘बेबी’ सिनेमातली कलाकारांचीच गर्दी अधिक जाणवते. दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार पृथ्वीराजची या सिनेमातली व्यक्तीरेखा पाहून त्याचे प्रेक्षक नक्कीच अवाक् होतील. सिनेमातले काही संवादही लक्षवेधी आहेत. ‘महिला या जन्मतःच हेर असतात..’ हा मनोजचा डायलॉग चित्रपटगृहात टाळ्या मिळवून जातो. काही दृश्य हसवतात तर काही विचार करायला भाग पाडतात.

असे असले तरी सिनेमाचे संकलन अधिक चांगल्या पद्धतीने करता आले असते. अॅक्शन सीनमध्ये संकलनाच्या चुका प्रकर्षाने जाणवतात. सिनेमातली काही गाणी निरर्थक वाटतात. त्या गाण्यांसाठी वापरण्यात आलेले कलाकारही का घेतले, असा प्रश्न पडतो तसेच सिनेमाचा क्लायमॅक्स अजून रंजक करता आला असता. पण एकंदरीत नीरज पांडे, तापसी पन्नू आणि अक्षय कुमार यांचे वेड लावणारे काम पाहायचे असेल तर हा सिनेमा एकदा तरी पाहावा असाच आहे.

सिनेमा- नाम शबाना
कलाकार- तापसी पन्नू, अक्षय कुमार, मनोज बाजपेयी, पृथ्वीराज, अनुपम खेर
दिग्दर्शक- शिवम नायर

मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com