दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनचा मुलगा अखिल अक्किनेनी याचा त्याची प्रेयसी श्रिया भुपाल हिच्याशी साखरपुडा झाला. एकमेकांना डेट करत असलेल्या या प्रेमीयुगुलांनी शुक्रवारी हैद्राबाद येथील जीव्हीके हाउस येथे खासगी पद्धतीने साखरपुडा केला.

अगदी नेमक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अखिल आणि श्रियाच्या साखरपुड्याला त्यांचे नातेवाईक आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील त्यांची काही जवळची मंडळी उपस्थित होती. या सोहळ्यात अनुप आणि पार्श्वगायक अंकित तिवारी यांनीही सादरीकरण केले. दरम्यान, हे प्रेमीयुगुल इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा आहे. या दोघांचा लग्नसोहळा अगदी थाटामात करण्यात येणार असून, या सोहळ्यासाठी जवळपास सहाशे मंडळी भारतातून इटलीला जाणार आहेत. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात अखिल आणि श्रियाची भेट झाली होती. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्यांनी वर्षाभरापूर्वीच आपल्या पालकांना त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत कल्पना दिली. हैद्राबाद येथे फॅशन डिझायनर असलेली श्रिया ही व्यावसायिक जीव्हीके रेड्डी यांची नात आहे. तसेच, दाक्षिणात्य फिल्मफेअरसाठी अधिकृतरित्या कॉस्चुम डिझायनर म्हणून काम पाहते. तिने टॉलीवूडमध्ये श्रिया सरण, काजल अग्रवाल, रकुल प्रित यांच्यासाठी काम केले आहे. तर बॉलीवूडमध्ये तिने श्रद्धा कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबत काम केले आहे.

अखिलने त्याच्या लग्नासाठी काही योजना केल्या आहेत. त्यानुसार, त्याचा भाऊ नागा चैतन्य याचा समंथाशी होणारा विवाहदेखील पुढे ढकलण्यात आला आहे. महिन्याभरापूर्वी एका पत्रकार परिषदेत बोलताना अखिल म्हणालेला की, चैतन्यचे लग्न पुढच्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये ढकलण्यात आले आहे. आमचे कुटुंब त्यांची लग्नगाठ बांधण्यासाठी योग्य मुहुर्ताच्या शोधात आहेत. अखिलच्या साखरपुड्याला समंथाने उपस्थिती लावली होती. तिने ट्विटरवर एक ट्विट केले असून त्यात म्हटलेय की, या प्रेमीयुगुलांना माझ्याकडून खूप सा-या शुभेच्छा. तुमचे पुढचे आयुष्य खूप सुंदर जावो.. हीच शुभेच्छा.

akhil-shreya-759

दरम्यान, अखिल त्याच्या कामातही बराच व्यस्त आहे. नागार्जुन आणि अखिल यांना ‘मनम’ या चित्रपटात दिग्दर्शन करणा-या विक्रम कुमार याच्या आगामी चित्रपटासाठी तो काम करत आहे. तसेच, अखिल आणि अर्जुन कपूर हे दुलकर सलमान याच्या तेलगु आणि हिंदी रिमेक असलेल्या कम्माती पादम या चित्रपटात एकत्र काम करणार असल्याचीही चर्चा आहे.