चित्रपटातून समाजप्रबोधन चांगले घडू शकते. मात्र, त्याकडे सजगपणे पाहिले पाहिजे. चित्रपटाविषयी बोलले पाहिजे, संवाद झाला पाहिजे तरच प्रबोधन घडू शकते. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकमुळे सगळेच पत्रकार झाले आहेत, असे वाटायला लागले आहे, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. हाणामारी आणि गाणी यापलीकडे न गेलेल्या भारतातील करमणूकप्रधान चित्रपटांमधून समाजप्रबोधन कसे घडणार, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शहीद भगतसिंग व्याख्यानमालेत ‘चित्रपटातून समाजप्रबोधन’ या विषयावर बोलताना मंजुळे म्हणाले, चित्रपट हे लोकप्रिय माध्यम आहे. सर्वाच्या समोर जाता येते, त्यातून चांगले समाजप्रबोधन करता येते. शहीद भगतसिंग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले हे खरे समाजप्रबोधनकार होते. मात्र, आता तशी माणसे राहिली नाहीत म्हणून प्रबोधनाची जबाबदारी चित्रपटावर येऊन पडली आहे. भारतात चित्रपटाकडे मनोरंजन म्हणून पाहिले जाते. चित्रपटाच्या आशयाकडे पाहिल्यास चांगले प्रबोधन घडू शकते. कलाकारांच्या कलेच्या पाठीमागे असणारा आशय हा महत्त्वाचा असतो. भारतातील चित्रपट करमणूकप्रधान असतात. हाणामारी, गाणी यापलीकडे ते गेले नाहीत. त्यामुळे त्यातून काय समाजप्रबोधन होणार हे तुम्हीच ठरवा, असे मंजुळे यांनी सांगितले.

‘सैराट’ चित्रपट तयार केल्यानंतर प्रेक्षकांना ‘आर्ची’, ‘परशा’, ‘झिंग झिंग झिंगाट’ आणि शंभर कोटींची कमाई इतक्याच गोष्टी समजल्या. मात्र, त्यातील आशय लोकांनी कसा घेतला, हे माहीत नाही. ‘ऑनर किलिंग’सारखे प्रकार कळले नाहीत. मग कसे समाजप्रबोधन होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘फॅन्ड्री’ चित्रपटातून एका भटक्या जमातीचे दु:ख समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, शैलजा पेरकर, संदीप घाडगे, सुहास घुमरे, राजेंद्र कोकाटे, प्रदीप पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदीप पवार यांनी केले.