नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ सिनेमाने २०१६ मध्ये फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला वेड लावलं आहे. सिनेमातील संगीताची जादू, आर्ची आणि परशाची जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. वर्षभरानंतरही चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. मराठीनंतर हा सिनेमा तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या चार दाक्षिणात्य आणि हिंदी भाषेतही बनवला जाणार आहे. ‘मनसु मल्लिगे’ या कन्नड भाषेतील रिमेकचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, त्याचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

कन्नड भाषेत बनल्या जाणाऱ्या सिक्वलचे नाव मनसु मल्लिगे असे आहे. याही सिनेमात रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ती या सिनेमात आर्ची नव्हे तर संजू ही व्यक्तिरेखा साकारत आहे. आईवडिलांच्या प्रेमात वाढलेली संजू कॉलेजमध्ये बिनधास्त वागते. ट्रेलरमध्ये वर्गात प्रियकराकडे बिनधास्त पाहणारी संजू आपल्याला दिसत आहे. या दृश्यात ‘सैराट’पेक्षा अनेक बदल करण्यात आले आहे. वर्गात आपल्या प्रियकराकडे एकटक पाहत असताना मधल्या बाकावर बसलेल्या मुलामुळे तिला तो नीट दिसत नसतो, म्हणून ती त्या मुलाच्या कानशिलातच लगावताना या ट्रेलरमध्ये दिसते. या ट्रेलरवरुन मूळ ‘सैराट’पेक्षा सिनेमात अनेक बदल केलेले दिसतात.

‘मनसु मल्लिगे’ या सिनेमात ‘सैराट’मधील अनेक प्रसंग अगदी जशेच्या तसे घेतलेले असले तरी कन्नड रिमेकमध्ये दाक्षिणात्य टच आपल्याला पाहायला मिळतोय. दूरवर पसरलेले शेत, मुक्त उडणारे पक्षी, धबधबे, सुंदर तळे यांचा खूपच चांगल्या प्रकारे वापर या सिनेमात केलेला दिसत आहे.

या सिनेमाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये तेवढीच टिकून आहे. ‘सैराट झालं जी…’ या गाण्यामध्ये आर्ची आणि परशा ज्या झाडावर बसले ते झाडं नंतर सेल्फी पॉईंट बनले होते. काही महिन्यांपूर्वी या झाडाची फांदी तुटल्यामुळे हळहळदेखील व्यक्त करण्यात आली होती. ‘मनसु मल्लिगे’मध्येही असेच एक झाड दाखवण्यात आले आहे. इतकेच नाही तर तलाव, विहीर, बोट असे प्रसंग या कन्नड सिनेमात मूळ ‘सैराट’सारखेच घेण्यात आले आहेत. तरी ट्रेलरच्या शेवटी अनेक घटनांमध्ये वाढ केल्याचेही दिसते. अजय- अतुलचेच संगीत असलेल्या या सिनेमाचे काला सम्राट एस नारायण यांनी दिग्दर्शन केले आहे.

‘मनसु मल्लिगे’ची हवा कर्नाटकासोबतच महाराष्ट्रातही तापत आहे. सैराटची कथा माहिती असल्यामुळे संवादांची अडचण सिनेमा पाहताना जाणवणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात हा सिनेमा मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.