माणूस कितीही मोठा झाला तरी शिधापत्रिकेतून अर्थात रेशन कार्डमधून नाव हटवण्यास त्याचं मन तयार नसतं. भलेही त्याने सुविधेचा फायदा घेवो अथवा नाही पण शिधापत्रिकेत नाव असावंच असा त्याचा अट्टाहास असतो. अनेकदा आपल्याला ज्या गोष्टीची गरज नाही ती गोष्टही माणूस स्वतःकडे हट्टापायी जपून ठेवतो. पण त्या गोष्टीचा इतरांना जास्त फायदा होईल ही भावना काही मनात येत नाही. पण याला अपवाद ठरलेत ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजूळे. नागराज यांनी चक्क त्यांचे शिधापत्रिकेतील नाव वगळण्यासाठी अर्ज केला आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्न सुरक्षेची गरज नसलेल्या नागरिकांनी या योजनेतून स्वच्छेने बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला योग्य प्रतिसाद देत नागराज यांनी करमाळ्यातील आपले रेशन कार्डवरील नाव कमी केले आहे.

करमाळ्यातील तहसीलदार कार्यालयात येऊन शिधापत्रिकेतून आपले नाव वगळण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना नागराज म्हणाले की, ‘माझ्याकडे असणारी पिवळी शिधापत्रिका मी वापरत नाही. माझे नाव वगळले गेले तर एखाद्या गरजूला याचा उपयोग होईल,’ करमाळ्यातील तहसीलदार संजय पवार यांच्याकडे त्यांनी हा अर्ज भरून दिला.

लवकरच नागराज मंजुळे त्यांच्या पहिल्या हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहेत. त्यांच्या या पहिल्याच सिनेमात बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन काम करणार आहेत. सामाजिक विषय प्रखरपणे मांडण्याची नागराज यांची खास शैली आहे. या सिनेमातूनही ते सामाजिक मुद्दाच घेऊन प्रेक्षकांसमोर येईल असे म्हटले जात आहे. नागराजचं दिग्दर्शन आणि अमिताभ यांचा अभिनय हा दुग्धशर्करा योग जुळून येईल असेच म्हणावे लागेल.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या मराठी सिनेमाने अभूतपूर्व यश मिळवलं होतं. हे यश एवढं मोठं होतं की या सिनेमाचे अन्य भाषांमध्येही रिमेक झाले. करण जोहरही या सिनेमाचा हिंदी रिमेक घेऊन येत आहे.