दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नेटिझन्सनकडून बरीच टीका झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी माफी मागितली आहे. इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार आपल्याला राजेश खन्ना यांच्यावर टीका करायची नव्हती असे शाह यांनी म्हटले आहे.
नसिरुद्दीन शाह म्हणाले की, मला केवळ हिंदी चित्रपटांच्या काही टप्प्यांबाबत बोलायचे होते. माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. राजेश खन्ना यांच्यावर टीका करण्याचा माझा उद्देश नव्हता. पण ट्विंकल त्यांना माफ करण्याच्या विचारात दिसत नाही. ट्विंकलने ट्विट करत म्हटले की,  नसिरुद्दिन शहांबद्दल पूर्ण आदर व्यक्त करते. माझे (वडील) ज्यांनी सिनेमावर मनापासून प्रेम केलं. आनंद, अमरप्रेम, कटीपतंग या सारख्या सुंदर कलाकृती दिल्या. माझ्या पाठीमागे उभे राहिलेल्या सर्वांचे आभार.

नसिरुद्दीन शाह काय म्हणाले होते
नसिरुद्दीन शाह यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आजकाल चांगले चित्रपट बनत नसल्याचे सांगत त्यासाठी अभिनेता राजेश खन्ना यांना कारणीभूत ठरवले. नसिरुद्दीन म्हणाले की, बॉलीवूडमध्ये काहीच बदल झालेला नाही. ५० वर्षांपासून ते तसेच आहे. फोटोग्राफी आणि एडिटिंग सोडले तर सर्व ७०च्या दशकाप्रमाणेच आहे. त्या काळी ७० च्या दशकात कथा, अभिनय, संगीत आणि गाणी बिघडू लागली होती. त्यावेळी रंगीत चित्रपट बनू लागले होते. हिरोईनला जांभळ्या रंगाचा ड्रेस तर हिरोला लाल रंगाचा शर्ट घालून त्यांचे काश्मीरमध्ये शूटींग केले की चित्रपट झाला. कोणी कथेचा विचारचं करत नसे. नंतर तो ट्रेण्डचं झाला होता. मला वाटतं तेव्हा राजेश खन्ना यांनी काहीतरी करायला हवं होत. त्यावेळी ते चित्रपटांमध्ये देव मानले जात होते. याव्यितरीक्त शाह यांनी राजेश खन्नांच्या अभिनयावरही प्रश्न उभा केला. ते म्हणालेले की, ७० च्या दशकातचं सामान्य दर्जाचे चित्रपट येण्यास सुरुवात झाली. त्याच वेळी राजेश खन्नाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ते यशस्वी कलाकार झाले, पण माझ्या नजरेत ते साचेबद्ध अभिनेता होते. मी तर म्हणतो ते एक निकृष्ट अभिनेता होते, असे नसिरुद्दीन यांनी मुलाखतीत म्हटले होते.