सिनेसृष्टीची निर्मिती करणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या नाशिक नगरीतील कलावंताना चंदेरी दुनिया तशी अनोळखी नाही. या दुनियेत नाशिकचा एक चेहरा आता सोनेरी पडद्यावर थेट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सर्वाधिक चर्चेचा ठरलेल्या ‘मिर्झिया’ या चित्रपटातून मुख्य भूमिकेत नाशिककर कन्या संयमी खेर बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. प्रसिध्द कलाकार अनिल कपूरचा मुलगा आणि सोनम कपूरचा लहान भाऊ हर्षवर्धन तिचा सहकलाकार आहे.

नुकतेच ‘मिर्झिया’ या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रदर्शित झाले असून त्याला दोन दिवसांत हजारोंहून अधिक हिट्स मिळाले. ‘रंग दे बसंती’ आणि ‘भाग मिल्खा भाग’चा निर्माता असलेल्या राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा ‘मिर्झिया’ हा अनोखा प्रयत्न असून या चित्रपटाशी संयमी खेरमुळे नाशिकशी धागेदोरे जोडले गेले आहेत.

संयमी मूळ नाशिककर असून एकेकाळच्या प्रख्यात अभिनेत्री उषा किरण यांची ती नात आहे. माजी मिस इंडिया प्रसिध्द मॉडेल उत्तरा खेर आणि अद्वैत खेर यांच्याकडून संयमीला मार्गदर्शन लाभले. संयमीचे माध्यमिक शिक्षण नाशिकमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने काही जाहिरातपटात काम केले. त्यात काही प्रसिध्द ‘बॅड्र्स’च्या जाहिरातींचा समावेश आहे. या दरम्यान तिला चित्रपटांसाठी विचारणा झाली. याच काळात प्रसिध्द दिनदर्शिकेसाठी तिने खास फोटोशूट केले. ‘मिर्झिया’तील तिच्या भूमिकेबद्दल सर्वामध्ये उत्सुकता आहे.

फिल्मफेअर मासिकावर संयमी आणि हर्षवर्धनची एकत्रित छबी झळकल्याने या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच ताणली गेली. ‘स्टारकीड’च्या पुढील पिढीतील या मिझिर्या चित्रपटातील शीर्षक गीत गूलजार यांनी शब्दबध्द केले आहे. गायक दलेर मेहंदीच्या आवाजाने जणू जादू भरली आहे. पंजाबी लोककथेवर आधारीत या चित्रपटाची कथा, पटकथा

देखील गुलजार यांची असून चित्रपटाला शंकर, एहसान, लॉय जोडीचे संगीत लाभलेले आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.