काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने गृहमंत्रालयाला सुचवलेल्या पर्यायानुसार शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने नवे तंत्रज्ञान सुरु केले. या तंत्रज्ञानाअंतर्गत ‘भारत के वीर’ या पोर्टल आणि मोबाइल अॅपही सुरु करण्यात आले.

भारतीय सैन्यदलातील जवानांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मदत करण्याच्या हेतूने सुरु करण्यात आलेल्या ‘भारत के वीर’ या वेबसाइटच्या नावाने सध्या काही बोगस वेबसाइट आणि अॅप चालवण्यात येत असल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘भारत के वीर’ या अॅपच्या नावाखाली काही बोगस अॅप सुरु झाल्याची माहिती देत खिलाडी अक्षय कुमारने याबाबत खंत व्यक्त केली.

चुकीच्या मार्गाने पैसे लाटण्याच्या हेतूने ‘भारत के वीर’च्या नावाखाली सध्या काही बोगस सेवांची हवा सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. याप्रकरणीच कोणाताही अनुचित प्रकार घडण्याआधीच अक्षयने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन हे अॅप आणि संकेतस्थळ वापरणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

देशातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैन्यदलातील जवानांसाठी, शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी खिलाडी कुमार नेहमीच पुढे सरसावत असतो. त्याने आजवर बऱ्याचदा शहिदांना सर्वतोपरी मदत देऊ केली आहे. किंबहुना या अॅपच्या संकल्पनेमध्ये अक्षयचंही योगदान आहे.

देशसेवेत वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या कुटुबिंयांना ‘भारत के वीर’ या अॅपच्या मदतीने सहजपणे आर्थिक मदत करता येऊ शकते. या सेवेअंतर्गत निमलष्करी आणि लष्करातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करणे शक्य झाले आहे. सीमारेषा किंवा अंतर्गत सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या जवानाला कर्तव्याचे पालन करताना वीरमरण आल्यास त्याच्या कुटुंबियांना मदत करण्यात यावी, अशी संकल्पना खुद्द खिलाडी कुमारनेच मांडली होती.

दरम्यान, वेबपोर्टल आणि मोबाईल अॅपच्या या नव्या योजनेमध्ये शहीद जवानांच्या नावांची सूची आणि त्यांच्या कुटुंबियांची माहिती त्यासोबतच शहीद जवानांच्या कुटुंबियांतील सदस्यांच्या बँक खात्याचा समावेश करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या सेवेअंतर्गत शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत केल्यानंतर आपल्या नावे एक प्रमाणपत्रही देण्यात येतं.