वितरक न मिळाल्याने काही आशयघन चित्रपटांपासून प्रेक्षकांना वंचित रहावं लागते आहे. या यादीतील काही नावं म्हणजे ‘कासव’, ‘दशक्रिया’, ‘हलाल’… यादीत या चित्रपटांचा समावेश होण्यापूर्वी आणखी एका चित्रपटाचं नाव समाविष्ट होतं. ते नाव होतं ‘रिंगण.’ पण आता मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून, ‘लॅन्डमार्क फिल्म्स’ प्रस्तुत आणि ‘माय रोल मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘रिंगण’ ३० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात निघालेल्या बाप-लेकाचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाने कित्येक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात ६३ व्या राष्ट्रीय पुरस्कारावर ‘रिंगण’ने आपली मोहोर उमटवली. त्याबरोबरच ५३ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक), सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायाचित्रदिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट बालकलाकर या पुरस्करांही याच चित्रपटाची छाप पाहायला मिळाली होती. त्याशिवाय ‘कान्स’, ‘स्टट्टगर्ट’ (जर्मन), ‘लंडन’, ‘टोरंटो’ या काही मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटानं आपलं वेगळेपण दाखवून दिलं. पण, तरीही या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वाटेत बरेच अडथळे आल्याचं पाहायला मिळालं.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मैदानात विजयाची पताका फडकवणारा असा हा चित्रपट अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आपली निर्मिती प्रेक्षकांसाठी मनोरंजनासोबतच बोधपूर्णही असावी या विचारांच्या विधी कासलीवाल निर्मित आणि मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’ अखेर प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे.