१९३१ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची प्रिंट उपलब्ध नसल्याने पहिल्या बोलपटाचा शोध सुरू 

गेल्या आठवडय़ात ८६ वर्षे पूर्ण झालेल्या आणि भारताकरिता ऐतिहासिक मूल्य असलेल्या ‘आलम आरा’ या पहिल्या भारतीय बोलपटाची ‘पिंट्र’ शोधण्याकरिता ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया’ने आता चित्रपट रसिकांनाच साद घातली आहे. या चित्रपटाची प्रिंटच आपल्याकडे उपलब्ध नाही; परंतु या चित्रपटाची पिंट्र कुठे ना कुठे तरी नक्की सापडेल, असा विश्वास संग्रहालयाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची पिंट्र, पोस्टर अशी कोणतीही गोष्ट असल्यास ती संग्रहालयाकडे आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आल्याचे संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी सांगितले.

शतकी वाटचाल करून पुढे आलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अनेक अभिजात चित्रपटांच्या पिंट्र खराब झाल्या आहेत. या पिंट्र पुनरुज्जीवित करून संग्रहित ठेवण्याचा प्रयत्न संग्रहालयाने ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’अंतर्गत करण्यात येत आहेत; पण १४ मार्च १९३१ साली प्रदíशत झालेला ‘आलम आरा’ या पहिल्या बोलपटाची पिंट्र संग्रहालयाकडे नाही. आर्देशीर इराणी दिग्दíशत ‘आलम आरा’ हा चित्रपट मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. पृथ्वीराज कपूर, मास्टर विठ्ठल आणि झुबेदा यांच्या मुख्य भूमिका असलेला हा बोलपट पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. त्या वेळीही वेगवेगळ्या कंपन्या चित्रपटांचे वितरण आणि प्रदर्शन करत असत. त्यामुळे त्यांच्यापकी कोणाकडे तरी नक्कीच या चित्रपटाची पिंट्र पडून असेल, अशी आशा ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’चे तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहणाऱ्या उज्ज्वल निरगुडकर यांनी दिली. त्या वेळचे निर्माते, वितरक यांची तिसरी पिढी आता कार्यरत असेल. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्यालयांमध्ये किंवा गोदामांमध्ये ही पिंट्र पडून असण्याची शक्यता आहे. निदान, या आवाहनामुळे कुठे तरी त्याचा शोध सुरू होईल आणि निश्चित काही तरी हाती लागेल, असा विश्वास निरगुडकर यांनी व्यक्त केला.

अभिजात चित्रपटांच्या पुनरुज्जीवनाचे काम याआधीही सुरू होते. मात्र आता ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’अंतर्गत केंद्र सरकारने या कामासाठी निधीही उपलब्ध करून दिला असल्याने अभिजात चित्रपटांच्या शोधाचे आणि रिस्टोरेशनचे काम अधिक वेगाने सुरू झाले असल्याचे निरगुडकर यांनी सांगितली. ‘आलम आरा’प्रमाणेच आणखीही काही दुर्मीळ चित्रपटांचा शोध सध्या संग्रहालयाकडून सुरू असल्याचे प्रकाश मगदुम यांनी सांगितले. देव आनंद यांचा एक चित्रपट आहे, ज्याची इंग्रजी आवृत्ती त्या वेळी प्रदर्शित झाली होती. त्यासाठीही आम्ही अनेकांकडे विचारणा केली होती, अशाच प्रकारे आवाहन केले होते. त्याला लोकांकडून प्रतिसाद मिळाला आहे. ‘आलम आरा’साठीही असाच प्रतिसाद मिळेल, असे ते म्हणाले.