आतापर्यंत शर्मिला टागोर आणि नवाब मंसून अली खान पतौडी यांच्या प्रेमाचे आणि लग्नाचे अनेक किस्से आतापर्यंत ऐकू आले आहेत. पण यावेळी खुद्द सोहाने आपल्या आई आणि बाबांच्या प्रेमाचे काही किस्से सांगितले. ज्यातला एक किस्सा म्हणजे सात फ्रिज देणे.
सोहाने सांगितले की, ‘बाबांनी आईच्या हृदयात आपले स्थान बनवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण काही झाले तरी आई त्यांना तेवढं महत्त्व देत नव्हती. तिलासारखं वाटत होतं की माहित नाही हे नवाब लोक कसे असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळेच आई सुरुवातीला बाबांच्या प्रेमावर विश्वास ठेवत नव्हती. पण तरीही बाबा प्रयत्न करतच राहीले. त्यांना जे जे शक्य होतं ते सर्व करण्याची त्यांनी तयारी दाखवली होती. स्वतःचं प्रेम पटवून देण्यासाठी बाबांनी तेव्हा एका मागोमाग एक असे सात फ्रिज आईला भेट म्हणून दिले.’

पुढे ती म्हणाली की, ‘मला नाही माहीत त्यांनी असे एका मागोमाग एक असे सात फ्रिज का पाठवले. पण मला वाटतं की तेव्हा फ्रिज असणं ही मोठी गोष्ट मानली जात असेल किंवा त्या काळातली सगळ्यात महागडी गोष्ट ही फ्रिज असेल. कुठल्याही पद्धतीने बाबांना आईला खुष करायचंच होतं. त्यामुळे ते सर्व प्रकारे प्रयत्न करत होते. मग काय? बाबांना वाटत होते की आई कोणत्यातरी प्रकारे आपली प्रतिक्रिया देईल. सात फ्रिज जेव्हा घरी आले तेव्हा आईने बाबांना फोन केला आणि म्हणाली, तुम्हाला वेड लागलं आहे का? हे काय चाललंय… या घटनेनंतर बाबांनी आईला जेवणासाठी विचारले आणि मग त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. त्यांच्या प्रेमाला या सात फ्रिजमुळे सुरुवात झाली.’

Soha_
सोहाने हेही सांगितले की, शर्मिला टागोर आणि नवाब पतौडी पहिल्यांदी एका बॉलिवूडच्या पार्टीमध्येच भेटले होते. पहिल्या भेटीपासूनच नवाब पतौडी शर्मिला यांच्या सौंदर्याने घायाळ झाले होते.