आधी बॉलीवूड मग हॉलीवूड आणि आता चक्क ‘फिल्डवूड’ या तीनही आघाडय़ांवर नवाझुद्दीन सिद्दकीची उत्तम कामगिरी सुरू आहे. आता हे फिल्डवूड म्हणजे काय?असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. हे ‘फिल्डवूड’ दुसरे तिसरे काही नसून शेतकरी नवाझुद्दीनची शेती होय. नवाझुद्दीन जितका चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे तितकाच शेतीच्याही कामात व्यस्त आहे. त्याचे शेती करतानाचे छायाचित्र आपण पाहू शकतो, मात्र हे छायाचित्र म्हणजे कुठल्याही चित्रपटाचे प्रमोशन नसून ही उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरच्या बुधानमध्ये नवाझुद्दीनची खरीखुरी शेती आहे ज्यात सध्या तो सामान्य शेतकरी म्हणून आपला घाम गाळतो आहे. नुकतेच त्याने हे छायाचित्र ट्विटरवर टाकले असून यात ओळखूही येणारही नाही इतक्या साधेपणाने तो शेतीच्या कामात रमला आहे. मात्र, नवाझला इतर शेतकऱ्यांप्रमाणे पाण्याची चिंता सतावत आहे. ज्याचा उल्लेख त्याने केलेल्या ट्विटमध्ये केला आहे. अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणामधून वेळ काढून नवाझ आपल्या घरी मुझफ्फरनगरमध्ये पोहोचतो आणि शेतीची कामे करतो ही कथा हिंदी चित्रपटात शोभावी अशीच आहे. मी शेतकरी घरात जन्माला आलो. आमची स्वत:ची शेतजमीन आहे. त्यामुळे आमची शेती सांभाळायला मला स्वत:ला आवडते, असे सांगत रुपेरी पडद्यावरचा शेतात शेतकरी म्हणून मळा फुलवणारा हा नट निराळाच!