‘मंटो’ सिनेमाचा फर्स्ट लूक आणि अभिनेता नवाजुद्दीनची ‘मंटो’तील व्यक्तिरेखेमधील पहिली झलक लघुपटाद्वारे पाहिल्यानंतर त्याने या सिनेमासाठी किती मेहनत घेतली असेल हे कळून येते. नवाजुद्दीनचा हरहुन्नरी अभिनय याआधीही पाहिला आहे. त्यामुळे ‘मंटो’च्या व्यक्तिरेखेमध्ये त्याला एवढे समरस झालेले पाहून दिग्दर्शक नंदिता दासने त्याची का निवड केली असेल हा प्रश्न पडत नाही. नवाजने या लघुपटात स्वतःच्या नैसर्गिक अभिनयाने एक वेगळी छाप पाडली आहे.

या लघुपटात नवाज ‘मंटो’च्या भूमिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलताना दिसत आहे. हा लघुपट पाहून नवाजच्या अभिनयाची पुन्हा एकदा पोचपावती मिळते. तसेच जर लघुपटात नवाजचे पारडे एवढे जड असेल तर सिनेमात नवाजचा अभिनय कसा असेल याबद्दल आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ‘मंटो’ची व्यक्तिरेखा नवाजने हुबेहुब पकडली आहे. नंदिता दासने ‘मंटो’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी हा लघुपट प्रेक्षकांसोर आणला. हा लघुपट नुकताच ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्येही दाखवण्यात आला होता.

या लघुपटात नवाज एका वर्गात बसलेल्या काही लोकांसोबत बोलताना दिसत आहे. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचे त्याचे मत आणि समाजाला आरसा दाखवणारे त्याचे लिखाण यावर बोलताना दिसत आहे. पांढरा कुर्ता आणि मोठा चष्मा घातलेला नवाज बोलताना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्यायला पूर्ण यशस्वी झालेला या लघुपटात दिसतो. या सिनेमासाठी नवाझुद्दीन आणि रसिका दुग्गल यांची स्क्रिन टेस्ट घेतली गेली होती. रसिका या सिनेमात मंटोची पत्नी म्हणजे साफिया यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

हा सिनेमा मंटो यांच्या आयुष्यातली अनेक पाने उलगडणारा असणार आहे. यात प्रेक्षकांना मंटोचा स्वभाव, संवेदनशीलता, धाडस आणि भीती याबद्दल कळणार आहे. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, नंदिताने म्हणाली की, ‘अजून या सिनेमावर काम सुरु आहे. मंटो यांचा लूक आणि त्यांचे व्यक्तिमत्व यावर अजूनही काम सुरु आहे. तसेच मंटो यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नवाजपेक्षा दुसरा कोणताच अभिनेता इथे एवढा चपखल बसू शकला नसता.’

nawazuddin-siddiqui-in-manto