नुकत्याच पार पडलेल्या ८९ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रविवारी (भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे) २६ फेब्रुवारीला डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्काराच्या ‘मेमोरियम सेगमेन्ट’मध्ये अभिनेता ओम पुरी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. प्रत्येक भारतीयासाठी तो क्षण अभिमान वाटावा असा होता. हॉलीवूडमधील या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याने काही भारतीय कलाकारांनी ट्विटर या सोशल साइटवरून आनंद व्यक्त केला.

गेल्या महिन्यात ओम पुरी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत मृत्यू झाला. या दिग्गज कलाकाराला ग्रॅमी आणि टोनी पुरस्कार नामांकित गायक आणि गीतकार सारा बरेलिसने स्वरांजली वाहिली. पण, बॉलीवूडकडे पुन्हा वळले असता एका कलाकाराने एक योग्य मुद्दा मांडल्याचे दिसते. ‘रईस’ अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याने बॉलीवूड चित्रपटसृष्टीचा चांगलाच समाचार घेतला आहे. या दिग्गज अभिनेत्याने त्यांच्या कारकिर्दीत दिलेल्या योगदानाची बॉलीवूडने कदर न केल्याचे नवाजुद्दीनने म्हटले आहे.

सोशल मिडीयावर राग व्यक्त करत नवाजुद्दीने लिहिले की, ‘अॅकॅडमी, ऑस्कर पुरस्काराने ओम पुरी यांनी श्रद्धांजली वाहिली. पण बॉलीवूडमधील एकाही पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या योगदानाबद्दल एकदाही उल्लेख करण्यात आला नाही. याची लाज वाटायला हवी.’ सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात नवाजुद्दीनने ओम पुरी यांच्यासोबत काम केले होते. चित्रपटात ओम पुरी यांची छोटी भूमिका होती. नंदिता दास हिच्या आगामी ‘मंटो’ या चित्रपटातही हे दोन्ही कलाकार एकत्र काम करणार होते.

ओम पुरी हे हॉलिवूड आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये भारतीय व्यक्तिरेखांची ताकद विस्तारणारे कसदार अभिनेते होते. १९८२ मध्ये आलेला रिचर्ड अटेनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटातून ओम पुरींनी आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये पदार्पण केले होते. मात्र त्यात त्यांची भूमिका फारच छोटी होती. १९९९ साली प्रदर्शित झालेला ‘इस्ट इज इस्ट’ हा त्यांचा ब्रिटीश चित्रपट चांगलाच गाजला. मात्र त्याही आधी त्यांनी ‘माय सन इज फनॅटिक’ या ब्रिटीश चित्रपटात काम केले होते. १९९२ सालचा ‘सिटी ऑफ जॉय’ हा त्यांचा पहिला हॉलिवूडपट. त्यानंतर त्यांनी ‘वुल्फ’, ‘द घोस्ट अॅण्ड द डार्कनेस’, अभिनेता टॉम हॅंक्स आणि ज्युलिया रॉबर्ट जोडीबरोबरचा ‘चार्ली विलसन्स वॉर’ या चित्रपटांमधून काम केले. तब्बल २५ आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.