चांगले मराठी चित्रपट एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी दरवर्षी एनसीपीएच्या ‘नवे वळण’ या मराठी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मिळते. याही वर्षी हा महोत्सव त्याच उत्साहात साजरा होणार असून नुकतेच ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारताकडून निवडल्या गेलेल्या ‘कोर्ट’ या चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित चित्रपटाने ‘नवे वळण’चा शुभारंभ होणार आहे. १० ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ‘नवे वळण’चे सातवे पर्व रंगणार असून एकूण सात मराठी चित्रपट या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत.
‘नवे वळण’ महोत्सवात पहिल्याच दिवशी १० ऑक्टोबरला एनसीपीएच्या लिटिल थिएटरमध्ये दुपारी ३ वाजता ‘कोर्ट’ हा चित्रपट पाहायला मिळेल. विवेक गोम्बरनिर्मित आणि अभिनीत ‘कोर्ट’ चित्रपटात एका शाहिराच्या लढय़ाच्या माध्यमातून समाजव्यवस्थेतील विसंगतीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. ‘कोर्ट’ ऑस्करसाठी प्रतिनिधित्व करणार असल्याने या चित्रपटाविषयी लोकांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता ‘बायोस्कोप’ हा चार मराठी दिग्दर्शकांनी केलेल्या लघुकथांचा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यात संदीप खरे यांच्या कवितेवर आधारित, रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला ‘मित्रा’, लोककवी यशवंत यांच्या कवितेवर आधारित, गिरीश मोहिते दिग्दिर्शत ‘बैल’, कवी सौमित्र यांच्या कवितेवर आधारित ‘एक होता काऊ’ हा विजू माने दिग्दर्शित लघुपट आणि मिर्झा गालिब यांच्या गझलवर आधारित, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘दिल-ए-नादान’ हे चार लघुपट ‘बायोस्कोप’मध्ये पाहायला मिळतील. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘हायवे-एक सेल्फी आरपार’ हा चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ११ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता पाहायला मिळेल. त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता जयप्रद देसाई दिग्दर्शित ‘नागरिक’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबरला संध्याकाळी ६.३० वाजता अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेला, समीर विद्वांस दिग्दर्शित ‘डबलसीट’ हा चित्रपट आणि १३ ऑक्टोबरला संध्याकाळी ६.३० वाजता अविनाश अरुण दिग्दर्शित, राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘किल्ला’ दाखवण्यात येणार आहे. महोत्सवाचा समारोप सचिन कुंडलकर दिग्दर्शित आगामी ‘राजवाडे अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटाच्या प्रीमियरने होणार आहे. १४ ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसहा वाजता हा चित्रपट दाखवण्यात येणार असून अतुल कु लकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी यांच्याबरोबरच सतीश आळेकर, ज्योती सुभाष यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार असून प्रत्येक चित्रपटानंतर त्यातील कलाकार आणि तंत्रज्ञांशी चर्चाही रंगणार आहे.